एल निनोचा संभाव्य प्रभाव, कमी प्रमाणातील पाऊस आणि उन्हाच्या तीव्र झळा या पार्श्वभूमीवर येत्या काळात वर्षभरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता ठाणे महापालिका प्रशासनाने पाणीकपातीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने ठाण्याच्या बाळकुममधील प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक रहिवासी, सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी विरोध अधिकच तीव्र केला असून याप्रश्नी शिवसेनेचे (उबाठा) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांची पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी भेट घेत चर्चा केली. ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत डेटा सेंटर व त्याच्या समितीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
डेटा सेंटर्सच्या सर्वंकष अभ्यासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही १६ सदस्यीय राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या डेटा सेंटरबाबत येत्या तीन महिन्यांच्या आत समितीला अंतिम अहवाल सादर करायचा आहे. या अहवालातून प्रकल्पांचे संभाव्य परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत शिफारशी अपेक्षित आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.्समितीच्या निष्कर्षांनंतरच प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होणार असल्याने, या समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत या प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती ठाकरे यांनी केली. तसेच प्रकल्पामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर आणि वीजवितरण व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडणार का, तसेच डिझेल जनरेटरमधून होणारे उत्सर्जन, ध्वनिप्रदूषण आणि उष्णतेचा स्थानिक परिसरावर काय परिणाम होईल, याचाही अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले.