जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रांच्या छायांकित प्रती (हार्ड कॉपी) जमा करण्याची आणि अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी वारंवार फेऱ्या मारण्याची कटकट संपली आहे. राज्य सरकारकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) सहकार्याने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पूर्णपणे ‘पेपरलेस’ संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. यामुळे अर्जापासून ते सुनावणीपर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन करता येईल. आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाणार आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र हे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि सरकारी नोकरीसह विविध कारणांसाठी आवश्यक असते. सध्या ऑनलाइन अर्ज केल्यानंतरही काही प्रकरणांमध्ये अर्जदारांना संबंधित जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांच्या हार्ड कॉपी जमा कराव्या लागतात. अर्जातील त्रुटी दूर करणे किंवा सुनावणीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे लागते. नव्या प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.कागदपत्रांबाबत किंवा जातीच्या पुराव्यांबाबत समितीला शंका असल्यास संबंधित अर्जदाराशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संपर्क साधला जाईल. ऑनलाइन चर्चा आणि सुनावणी घेऊन अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीकडून गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल. सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये समितीकडून अर्जदाराला तीन तारखांचे पर्याय दिले जातील. त्यापैकी सोयीची तारीख निवडून अर्जदाराला ऑनलाइन सुनावणीमध्ये सहभागी होता येईल.