चॅटबॉट घेणार शिक्षकांची हजेरी

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
चॅटबॉट घेणार शिक्षकांची हजेरी
शाळेतील शिक्षकांची हजेरी नोंदवण्यासाठी आता चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते बारावीच्या शिक्षकांना ‘स्विफ्टचॅट’ ॲपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ बॉटद्वारे दररोज ऑनलाइन हजेरी नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

शिक्षण आयुक्तालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या कार्यचौकटीअंतर्गत शिक्षकांची उपस्थिती शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून प्रत्यक्ष वेळेतील माहिती फलकाद्वारे नोंदवण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती स्विफ्टचॅट ॲपमधील बॉटद्वारे नोंदवली जाणार आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.
शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रथम स्विफ्टचॅट ॲप डाउनलोड करून मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करायची आहे. त्यानंतर शाळेचा ११ अंकी यूडायस कोड आणि शिक्षकांचा शालार्थ आयडी किंवा राष्ट्रीय शिक्षक कोड वापरून माहितीची पडताळणी करावी लागेल. प्रत्येक शिक्षकाची उपस्थिती, गैरहजेरी, अर्धी रजा, पूर्ण रजा, तसेच प्रशिक्षण किंवा कार्यशाळेतील सहभाग यांची नोंद बॉटवर करता येणार आहे. माहिती भरल्यानंतर उपस्थितीची नोंद जतन होईल.

सकाळच्या वेळेत नोंदवावी लागणार हजेरी

परिपत्रकानुसार, ज्या शाळा शालेय पोर्टलवर नोंदणीकृत आहेत, तेथील मुख्याध्यापकांनी स्विफ्टचॅट ॲपमधून शिक्षकांची उपस्थिती नोंदवायची आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सुरू होणाऱ्या शाळांमध्ये सकाळी ९ ते ९.३०, तर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू होणाऱ्या शाळांमध्ये सकाळी १० ते १०.३० या वेळेत हजेरी नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या लिंकवर करा तक्रार

उपस्थिती नोंदवण्यात अडचणी येत असल्यास https://tinyurl.com/ AttendanceBot या लिंकवर तक्रार सादर करता येईल. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे अहवालही ॲपमधून मिळवता येणार आहेत.