तीन वर्षांत पुणे शहर होणार कोंडीमुक्त

Contributed by: पुणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तीन वर्षांत पुणे शहर होणार कोंडीमुक्त
‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी अंतर्गत रिंग रोड, उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर), मेट्रो आणि भूमिगत बोगद्यांचे जाळे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे पुढील तीन वर्षांत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक कोंडीमुक्त होईल,’ असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा संवाद’ कार्यक्रमात डुडी यांनी पुणे जिल्ह्यातील वाहतूक, पाणीटंचाई, दुष्काळ, पुरंदर विमानतळ, चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि भीमाशंकर मंदिराच्या जीर्णोद्धारासह विविध विषयांवर भूमिका मांडली. ‘मटा’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांनी त्यांचे स्वागत केले.
‘शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा बाह्य रिंगरोड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अंतर्गत रिंग रोड आणि ‘एचसीएमटीआर’ हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः अंतर्गत रिंग रोड आणि ‘एचसीएमटीआर’मुळे शहरातील वाहतूक कोंडीत ३५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची अपेक्षा आहे,’ असे डुडी यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रस्ते, मेट्रो आणि बोगदे यांची एकत्रित जोडणी झाल्यानंतर शहरांतर्गत; तसेच शहराबाहेरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘पुरंदर विमानतळासाठी जमिनीचा मोबदला निश्चित करण्यापूर्वी शेतकऱ्यांशी दीडशेहून अधिक बैठका घेण्यात आल्या. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या तरतुदींची शेतकऱ्यांना माहिती होती. त्यांच्या सूचनांमधून पॅकेजचे स्वरूप ठरले आणि राज्य सरकारने त्याला मान्यता दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली,’ असे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारावा, या उद्देशातून ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेची संकल्पना पुढे आली. खराब रस्त्यांच्या सुधारणेलाही या उपक्रमाचा फायदा होत आहे, असा विश्वास डुडी यांनी व्यक्त केला.

पुरंदर विमानतळापर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी दिवे घाटामध्ये दोन मोठ्या बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे. यापैकी एक बोगदा मेट्रोसाठी, तर दुसरा रस्ते वाहतुकीसाठी असणार आहे. या दोन्ही बोगद्यांची लांबी सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या आसपास असणार आहे. पुणे शहरापासून या विमानतळापर्यंत अवघ्या २५ मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. हे बोगदे येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली. चाकण औद्योगिक परिसरातील प्रवाशांना बाह्य रिंग रोडमुळे थेट पुरंदर विमानतळाकडे जाता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.