केळीच्या पाच हजार झाडांवर फिरवला ट्रॅक्टर

Contributed by: अमरावती,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
केळीच्या पाच हजार झाडांवर फिरवला ट्रॅक्टर
हंगामाच्या तोंडावर मिळणारा कवडीमोलाचा दर आणि व्यापाऱ्यांची मनमानी यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक कोलमडून पडले आहेत. उत्पादन खर्च तर दूरच, साधा वाहतुकीचा खर्च निघणेही दुरापास्त झाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक आता शेतात दिसू लागला आहे. अंजनगाव बारी परिसरातील रवींद्र मेटकर यांनी दराच्या या प्रचंड तफावतीला कंटाळून अखेर तीन एकरातील तब्बल पाच हजार केळीच्या झाडांवर ट्रॅक्टर फिरवून उभे पीक उद् ध्वस्त केले.

पारंपरिक पिकांना फाटा देत अंजनगाव बारी व लगतच्या भागात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी केळी लागवडीला पसंती दिली होती. मात्र, आज हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. मेटकर यांनी जुलै २०२५मध्ये तीन एकरांत पाच हजार रोपांची लागवड केली होती. रोपे, ठिबक सिंचन, खते व मशागतीपोटी तीन लाखांहून अधिक भांडवल ओतले. मात्र, पीक तयार झाल्यावर व्यापाऱ्यांनी अवघा ४ ते ५ रुपये प्रतिकिलोचा दर लावून शेतकऱ्यांची उघड अडवणूक सुरू केली. त्यातच ८८ किलोमीटर अंतरावरील बाजारपेठेत माल नेण्याचा प्रवासखर्च परवडणारा नसल्याने, विक्रीतून नफ्याऐवजी तोटाच पदरी पडणार हे उघड झाले. अखेर उघड्या डोळ्यांनी स्वत:चे स्वप्न मातीमोल पाहण्याशिवाय मेटकर यांच्याकडे पर्याय उरला नाही. सध्या संपूर्ण परिसरात हेच चित्र आहे. लाखोंची गुंतवणूक करूनही उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा पार कोलमडला आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.