बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ची नजर

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,भंडारा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
use of artificial intelligence on reckless drivers
रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आता अधिक अद्ययावत झाले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी भंडारा आरटीओच्या ताफ्यात ‘ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ’ आणि रडार तंत्रज्ञानाने सज्ज असलेले अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. या वाहनाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

या अत्याधुनिक वाहनाच्या छतावर ‘मोबाइल ट्रॅकिंग एन्फोर्समेंट सिस्टिम’ बसवण्यात आली आहे. यातील कॅमेरा १८० डिग्रीच्या कोनात फिरून रस्त्यावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. यात रडारसोबतच विशेष ‘इन्फ्रारेड लाइट्स’चा वापर करण्यात आल्यामुळे रात्रीच्या अंधारात किंवा दाट धुक्यातही नियम तोडणाऱ्या वाहनांचे स्पष्ट चित्रीकरण होणार आहे. यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कारवाई करणे आरटीओ प्रशासनाला शक्य होणार आहे.
हे वाहन भंडारा शहरातील विविध भागांसह महामार्ग आणि ग्रामीण भागांमधील अपघातप्रवण क्षेत्रांत गस्त घालणार आहे. यामध्य स्वयंचलित ई-चालन केले जाईल. सीट बेल्ट न लावणे व हेल्मेट न वापरणे, वेगमयार्दा ओलांडणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, वाहनाच्या कागदपत्रांची मुदत संपलेली असणे आदींवर ई-चलन होणार आहे.

हे तंत्रज्ञान केवळ शहरापुरते मर्यादित नसून भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केले जाणार आहे. जिथे वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होते, अशा ठिकाणी ही वाहने तैनात केली जातील.

या अत्याधुनिक प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप न होता थेट स्वयंचलित ई-चालन जारी होणार आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वचक बसेल आणि रस्ते अपघात कमी होण्यास मोठी मदत होईल, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हटले आहे.