विमानतळ परिसरात १८३ धोकादायक अडथळे

महाराष्ट्र टाइम्स
183 dangerous obstacles near dr babasaheb ambedkar airport
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवतालच्या परिसरातील १८३ निवासी व व्यावसायिक इमारती, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या इमारती तसेच त्यावरील साहित्य विमान उड्डाणासाठी अडथळे ठरत असल्याचे समोर आले आहे. विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस सर्वेक्षणानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.

प्राधिकरणाने दोन वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या आधारे हे अडथळे निश्चित केले आहेत. २०२२-२३च्या ओएलएस सर्वेक्षणात अनेक नव्या इमारती, घरे आणि गृहनिर्माण संस्थांची नावे अडथळ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यापूर्वी २०१८-१९मध्ये झालेल्या सर्वेक्षणात निश्चित करण्यात आलेल्या अडथळ्यांबाबत डीजीसीएने जून २०२४मध्ये वैयक्तिक सुनावणीही घेतली होती.
विमानतळाच्या आजूबाजूच्या अनेक वस्त्या या नियमांच्या कक्षेत आल्या आहेत. यात मनीषनगर, जयताळा, सोनेगाव, इंद्रप्रस्थनगर, स्वावलंबीनगर आणि हिंगणा रोड परिसरांचा प्रामुख्याने समावेश आहे. सामान्य नागरिकांची घरेच नव्हे, तर शहरातील काही मोठ्या संस्थांच्या इमारतींचाही या यादीत उल्लेख आहे.

विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उंचीची बांधकामे, वाढीव मजले, इमारतींवरील पाण्याच्या टाक्या, मोबाइल टॉवर आणि पाइप्स अडथळे ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यादीत संबंधित मालमत्ताधारकांची नावे, पत्ते आणि मोबाइल क्रमांकही नमूद आहेत.