वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर राख गोळा करण्यासाठी गेलेल्या मुलाला चितेवर अघोरी पूजेचे साहित्य आढळल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साळवा येथील स्मशानभूमीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कथित मांत्रिक रामनरेश नथ्थू विश्वकर्मा (वय ५८, रा. प्रधानमंत्री आवास योजना, भिलगाव) याला अटक केली.
साळवा येथील प्रशांत बाळू चाचेरकर (वय ३१) यांच्या वडिलांचे निधन झाले होते. गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २५ ऑगस्टला सकाळी प्रशांत हे राख सावळण्यासाठी स्मशानभूमीत गेले. यावेळी त्यांना चितेवर पिवळ्या कापडाची बाहुली, लाल-पिवळा धागा, द्रवाने भरलेली बाटली, लिंबू आणि कवड्या ठेवलेल्या दिसल्या. शोकसभागृहातील बाकड्यावरही कपडे, मोजे, बुटांची जोडी, लिंबू आणि कवड्या ठेवण्यात आल्याचे आढळले.याच दिवशी सायंकाळी चाचेरकर यांच्या घराच्या चारही दिशांना कापलेले लिंबू ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशांत यांनी तत्काळ कुही पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमां’तर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी रामनरेश विश्वकर्मा याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या अघोरी पूजेचा उद्देश काय होता, याचा तपास कुही पोलिस करीत आहेत.