तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स
death of newborn in tiroda sub district hospital investigation into cause underway
‘सुरुवातीला माता आणि बालक दोघांची प्रकृती सामान्य होती. प्राथमिक अंदाजानुसार, रात्रीच्या वेळी मातेने झोपलेल्या अवस्थेत बालकाला स्तनपान दिल्याने बालकाचा श्वास गुदमरला असण्याची शक्यता आहे’, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल शेंडे यांनी सांगितले. मात्र, नवजात बालकाच्या मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असेही डॉ. शेंडे यांनी सांगितले. तिरोडा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बालकाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी शवविच्छेदनास संमती दिली.
तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील एका गर्भवती महिलेला २९ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेने निरोगी मुलाला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर माता आणि बालक दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय कक्षात उपचार व निरीक्षणाखाली होते. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास बालकामध्ये कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ऑन-ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. डॉक्टरांनी बालकाची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने तिरोडा पोलिस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच हवालदार सुनील नामूर्ती आणि पोलिस कर्मचारी मोहित चौधरी यांनी रुग्णालयात पोहोचून घटनेचा पंचनामा केला. मात्र, नवजात बालकाचे शवविच्छेदन करण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यामुळे काही काळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

अखेर पोलिसांनी आणि रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असल्याचे पटवून दिल्यानंतर नातेवाइकांनी संमती दिली. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.