Political Confrontation Between Mlas Gaikwad And Mahale Takes Center Stage
दम असेल तर मैदानात या!
महाराष्ट्र टाइम्स•
आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. काही दिवसांपूर्वी गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांचा चिखलीत ‘रोड शो’ झाला होता. आता विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर महाले यांनी काउंटर रॅली काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘आम्ही शराफतीमध्ये राहतो, याचा अर्थ असा नाही की आम्ही कुणाला घाबरतो. दम असेल तर मैदानात या, आम्ही दाखवून देऊ की, कोण किती पाण्यात आहे. आता यापुढे बुलढाणा विधानसभेत हुकूमशाही, दमदाटी खपवून घेणार नाही’, असा इशारा भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता दिला. या इशाऱ्याने महायुतीतील दोन नेत्यांमधील राजकीय द्वंद्व चर्चेचा विषय ठरले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक विद्याधर महाले यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त १ सप्टेंबरला बुलढाणा येथे विद्याधर महाले मित्रमंडळाच्यावतीने रॅली काढण्यात आली. धाड नाक्यापासून संगम चौक आणि जयस्तंभ चौकात ही जंगी रॅली पोहोचली. याठिकाणी आमदार महाले यांनी आमदार गायकवाडांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. ‘देवाभाऊंचा हा महाराष्ट्र आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा हा महाराष्ट्र आहे, गद्दारांचा नाही, असे ठणकावले.
रॅली जयस्तंभ चौकात असताना महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करतेवेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यावर संताप व्यक्त करताना आमदार महाले म्हणाल्या, ‘तुम्हाला जे म्हणायचे आहे, ते समोर येऊन करा. अशा पद्धतीचे राजकारण करणे कुत्सितपणाचे लक्षण आहे.’
जयस्तंभ चौकातच आमदार गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. हा चौक शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या चौकाकडे सर्वांचे विशेष लक्ष असते. याच चौकात महालेंची रॅली बराचवेळ थांबलेली होती आणि कार्यकर्ते जल्लोष करीत होते. तर आमदार महाले या ‘बाप तो बाप रहेगा...’या गाण्यावर थिरकल्या.
रॅलीतील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी विद्याधर महाले व श्वेता महाले यांचा सत्कार केला. गुलालाची उधळण करून मिशावर ताव मारत दंड थोपटल्याच्या कृतीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले आहे.
सोशल मीडिया वॉर
आमदार श्वेता महाले यांनी सोशल मीडियावर आपले व्हिडीओ सिनेमातील डॉयलॉग बाजीचे मिश्रण करून व्हिडीओ टाकले. त्याला प्रत्युत्तर म्हणून कुणाल गायकवाड यांचेही व्हिडीओ समोर येत आहेत. दोघांच्याही व्हिडीओमध्ये व्यक्तिगत नावांचा उल्लेख नसला तरी प्रासंगिक संवादफेक करण्यात आली आहे. या सोबतच गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजीचा वॉरही भडकल्याचे चित्र बुलढाणा व चिखलीत पाहायला मिळाले.