जमिनीखाली असणारी केबल चोरण्याच्या उद्देशाने केबल तोडणाऱ्या टोळीला हटकल्याच्या रागातून बशीर कमरुद्दिन शेख (वय ३४) या जागरूक नागरिकाला संशयितांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल फोन बळजबरीने हिसकावून घेतल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री नाशिकरोडमधील कलंत्री बिल्डींगजवळ घडला.शेख यांच्या फिर्यादीवरून संशयित गोपाल हरपाल शर्मा (रा. गुडगाव, हरियाणा), विजयसिंग खूपसिंग कुमार (रा.नवी दिल्ली), चंद्रशेखर सुरेश चंद (रा. गुडगाव), प्रदीप सुभाष आवारे (रा. कात्रज, पुणे), जसविंदर सिंग भाटिया (रा. गुडगाव हरियाणा), पंकज अनिल कापसे (रा. एकलहरा), सतनाम हरिनाम लोधी (रा. नवीन सामनगाव) या सात जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संशयितांचा यापूर्वीही काही चोरीच्या घटनांत सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्धा तास खोळंबले प्रवासी
सातपूर : पालघरहून पाचाेऱ्याकडे जाणाऱ्या बसवर दुचाकीचालक धडकताना बचावला. यावेळी बस चालकाने दुचाकीचालकाला खडसावले. याचा राग मनात धरून दुचाकी चालकांनी बसचालकाला शिवीगाळ करीत बस पोलिस स्टेशनला घेण्यास सांगितले. शिवीच्या किरकोळ वादातून तब्बल अर्धा तास प्रवाशांना ताटकळत बसमध्ये बसून रहावे लागले. पोलिसांच्या सूचनेनुसार दुचाकीचालकांनी बसचालक व वाहक यांची माफी मागत घडलेल्या घटनेवर पडदा टाकला.