रात्रीच्या किर्र अंधारात दाट झाडीत दरोडा टाकण्याच्या तरुणीने सहा संशयित दरोडेखोर एकत्र आल्याचे जागरूक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ११२ डायलवर माहिती दिली. त्यानंतर रात्र गस्तीवर असलेल्या नाशिकरोड पोलिसांच्या वाहनांचा ताफा अवघ्या चौथ्या मिनिटाला विहितगाव येथील पाटील नर्सरीजवळील पुलाजवळ थांबला. पोलिसांचा ताफा दिसताच सहा दरोडेखोर वाट मिळेल तिकडे पळत सुटले. पोलिसांनी दाट झाडीत त्यांचा पाठलाग करीत तिघांना जेरबंद केले.
या थरारक कारवाईत गोरख मोहन सावंत (२१, रा. चेहेडी, सामनगावरोड), अक्षय संजय दवणे (२१, रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) आणि विठ्ठल अशोकसिंग परदेशी (२३, रा. अस्वले मळा, एकलहरे रोड) या तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर आकाश श्रीवंत, नवनाथ शिंदे आणि अमोल शिरसाट हे अंधार व दाट झाडांचा फायदा घेत निसटले.या कारवाईत नाशिकरोड पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या तिघा सराईत घरफोड्यांपैकी गोरख सावंत आणि अक्षय दवणे या दोघांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री चेहेडी शिवारातील म्हाडा कॉलनीतील साईदर्शन बी विंग इमारतीतील जनार्दन उगले यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली. यात चोरलेले ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्रही पोलिसांनी जप्त केले.