आणखी हिमनग कोसळण्याची भीती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आणखी हिमनग कोसळण्याची भीती
तिबेटी पठारावरील हिमनग अधिक अस्थिर होण्याची शक्यता असून, त्यामुळे ते कोसळण्याचा धोका आहे, असा इशारा चीनच्या एका वरिष्ठ हवामान अधिकाऱ्याने दिला आहे. गेल्या आठवड्यात तिबेट-नेपाळ सीमेवर अचानक आलेल्या पुराच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती त्यामुळे व्यक्त होत आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर २६ ऑगस्ट रोजी बर्फ, खडकांच्या हिमस्खलनामुळे अचानक आलेल्या महापुरातील मृतांची संख्या १,२५२वर पोहोचली आहे.

चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राचे उपसंचालक गाओ रोंग यांनी हा इशारा दिला. ‘गेल्या ६० वर्षांत तिबेटी पठारावरील हिमनगांचे क्षेत्रफळ सुमारे २४ टक्क्यांनी घटले आहे, तर सुमारे ७,००० लहान हिमनग पूर्णपणे नाहीसे झाले आहेत. आगामी काळात तिबेटी पठारावरील हिमनगांची संरचनात्मक स्थिरता आणखी कमी होईल. हिमनगासंबंधित आपत्ती अधिक वारंवार होण्याची शक्यता आहे आणि साखळी परिणामांमुळे त्यांचा विध्वंस व प्रभावक्षेत्र वाढू शकते,’ असे ते म्हणाले.
‘चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसची अधिकृत संस्था असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटन प्लेटो रिसर्चनेही या आपत्तीवर अहवाल दिला आहे. हिमनग कोसळल्याने निर्माण झालेला पाण्याचा लोट दरीतून २२ किमी प्रवास करून केवळ सात मिनिटांत तिबेट सीमेवरील ग्यिरोंग पोर्टपर्यंत पोहोचला, असे या अहवालात म्हटले आहे. येथून पुढे फक्त सुरुवातीच्या कोसळण्याचे मोजमाप करून करता येणार नाही,’ असे काही शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

‘आपत्ती अतिवृष्टी किंवा हिमनगांची वाढती पातळी अशा नेहमीच्या संकेतांमुळे नव्हे, तर उंच प्रदेशातील हिमनग, खडक प्रणाली निकामी झाल्यामुळे उद्भवली. त्यामुळेच याचे भाकीत करणे कठीण ठरले,’ असेही संशोधकांचे म्हणणे आहे.