Driver Dozes Off Car Overturns But Escapes Unharmed
चालकाला डुलकी अन् कारच्या पलट्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटलेली स्विफ्ट कार महामार्गालगतच्या लोखंडी सुरक्षा जाळीला धडकली. या अपघातात कारने दोन पलट्या घेतल्याने कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कारचा चालक अजय शेळके बचावले.
अजय शेळके (रा. कराडी, पुणे) हे पुण्याहून नाशिकला स्विफ्ट कारने (क्र. एमएच १२, झेडएस ४९२८) येत होते. रात्रीचा प्रवास करून त्याची कार नाशिक-पुणे महामार्गाने नाशिकरोड येथील सिन्नरफाटा परिसरात गुरुवारी सकाळी सात वाजता आली. चेहेडी शिव येथील उड्डाणपूल ओलांडून पुढे भरधाव वेगाने येताना चालक शेळके यांना डुलकी लागली. काही कळण्याच्या आत कार महामार्गालगतच्या डाव्या बाजूकडील लोखंडी सुरक्षा जाळीला आणि पावसाळी गटाराच्या सिमेंट काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली. या धडकेनंतर कार हवेत उडून कारने दोन पलट्या खाल्ल्या आणि ती पुन्हा महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला येऊन धडकली. बाजूच्याच सर्व्हिस रोडवरून पायी जाणाऱ्या नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी कारच्या चालकाच्या मदतीसाठी महामार्गावर धाव घेतली. परंतु, कारमधील चालक अजय शेळके स्वतःच बाहेर पडल्याचे बघून नागरिकांना हायसे वाटले. या अपघातात कारच्या पुढील भागाचा पूर्णतः चक्काचूर होऊन देखील चालक अजय शेळके सुखरूप राहिल्याने देव तारी त्याला कोण मारी या उक्तीची प्रचिती त्याला आणि नागरिकांना आली. नाशिकरोड पोलिसांनी दाखल होत अपघातस्थळी विखुरलेले कारचे सुटे भाग, महामार्गालगतचे तुटलेले लोखंडी रेलिंग महामार्गावरून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.