संरक्षण मुत्सद्देगिरीवरील ‘रक्षा’ प्रकाशित

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
संरक्षण मुत्सद्देगिरीवरील ‘रक्षा’ प्रकाशित
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी कर्तव्य भवन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात संरक्षण मुत्सद्देगिरीवरील ‘रक्षा’ या दस्तावेजाचे अधिकृत प्रकाशन केले.

हा सर्वसमावेशक दस्तऐवज पुढील दहा वर्षांसाठी भारताच्या जागतिक संरक्षण भागीदारीची धोरणात्मक रूपरेषा स्पष्ट करतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांना सक्रिय आंतरराष्ट्रीय सहकार्याशी जोडून दीर्घकालीन स्थैर्य आणि परस्पर विकासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करणे. मित्र देशांसोबत संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे. भारताला जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्यासाठी देशांतर्गत संरक्षण मंचांना प्रोत्साहन देणे. हिंदी महासागर क्षेत्रात भारताची ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ आणि संकटसमयी तत्पर मदत करणारा देश म्हणून भूमिका मजबूत करणे, याचा या धोरणात्मक आराखड्यात समावेश आहे. ‘हा उपक्रम भारताला प्रादेशिक स्थैर्याचा भक्कम आधार बनवण्यास मदत करील,’ असे संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क संचालनालयाने नमूद केले.

राजनाथसिंह यांनी बेल्जियमचे संरक्षण आणि व्यापारमंत्री थिओ फ्रँकेन यांच्याशी नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांनी औद्योगिक सहकार्याला गती देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली. बेल्जियमचे तंत्रज्ञान आणि भारताचे कौशल्य एकत्र आणण्यावर यामध्ये भर देण्यात आला. सध्याच्या जागतिक आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारत आणि बेल्जियममधील भागीदारीचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे सांगून सिंह यांनी लोकशाही मूल्ये आणि दोन्ही देशांची परस्पर निष्ठा अधोरेखित केली.