नवी दिल्ली : काही न्यायालयीन अधिकाऱ्यांवर वैयक्तिक टीका करणारे आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा कमी करणारे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी न्यायालय अवमानाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या एका यूट्यूबरला सुनावलेली सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगित केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने गुलशन पाहुजा यांनी दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी घेण्याचे मान्य केले. पाहुजा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला आव्हान दिले होते.
लखनौ विमानतळावर खबरदारीचे लँडिंगलखनौ : वाराणसीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘आयएक्स १२५३’ विमानातील ‘कार्गो होल्ड’मध्ये (विमानाचा माल ठेवण्याचा भाग) स्मोक डिटेक्शन अलार्म वाजल्यामुळे गुरुवारी सकाळी लखनौ विमानतळावर खबरदारीचा उपाय म्हणून विमान उतरवण्यात आले. विमानात १५५ प्रवासी होते. प्राथमिक तपासणीत विमानात धूर किंवा आगीचे कोणतेही चिन्ह नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमली पदार्थप्रकरणी ‘ईडी’चे छापे
चेन्नई : सीमापार संबंध असलेल्या अनेक अमली पदार्थ तस्करी प्रकरणांशी संबंधित मनी लाँडरिंगच्या तपासाचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळम या चार राज्यांत छापे टाकले. स्वतंत्र अमली पदार्थ तस्करीशी संबंधित सुमारे आठ राज्य पोलिस यंत्रणा आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) ‘एफआयआर’; तसेच संबंधित आरोपपत्रांच्या आधारे ‘ईडी’ने ही कारवाई केली.