Teachers And Parents Should Keep Reading Culture Alive
शिक्षक,पालकांनी जागृत राहावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शिक्षक,पालकांनी जागृत राहावे
‘सध्या टेलिव्हिजन, मोबाइलमुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे; तसेच विविध प्रकारच्या समाजमाध्यमांच्या प्रभावाखाली सध्याच्या पिढीतील सर्वच स्तरातील विद्यार्थी व युवा आकर्षित होत असल्याचे वास्तव चित्र आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल, अशी पुस्तके मुले वाचतील याबाबत शिक्षक आणि पालकांनी अधिक लक्ष केंद्रित जागृत राहावे,’ असे मत तिसऱ्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग आणि लोणावळा येथील मनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण म्हणून लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नांदी संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते झाले, त्या वेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तांबे बोलत होते.
या वेळी मनशांती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त आणि तिसऱ्या नांदी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह माधव राजगुरू, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार उपस्थित होते .
या वेळी बोलताना राजीव तांबे म्हणाले, ‘बालमनात उत्सुकतेपोटी बालकांच्या बालमनात अनेक प्रश्न येतात. त्या प्रश्नांना योग्य त्या भाषेत योग्य ती उत्तरे मिळाली, तर त्या बालकाचे भविष्यात उत्कृष्ट लेखकात देखील परिवर्तन होऊ शकते.’
या वेळी बोलताना योगेश सोमण म्हणाले, ‘जानेवारीत शंभरावे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असून, लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला साहित्य मेजवानी मिळेल अशी खात्री आहे.’
तिसऱ्या नांदी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मनशांती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी संमेलन आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रसाद मिरासदार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.
‘विज्ञान गप्पागप्पी’ या कार्यक्रमाद्वारे संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर ‘कोवळे काव्यरंग’ या मुलांच्या समृध्द कवितावाचनाच्या कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप झाला.