‘चॅटजीपीटी वापरताना पाण्याची नासाडी नाहीच’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
chatgpt water usage minimal openai ceos clarification
‘ओपनएआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी डेटा सेंटरच्या संसाधनांच्या वापरावरील, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) आवश्यक पाण्याचा गैरवापर वा नासाडी होत असल्याचा दावा फेटाळला आहे.

या महाकाय रचना थंड करण्यासाठी गोड्या पाण्याच्या वापराबद्दल लोकांमध्ये असलेली भीती अतिशयोक्तीपूर्ण असून, आधुनिक सर्व्हर कूलिंग पायाभूत सुविधांमधील मोठ्या सुधारणांकडे ती दुर्लक्ष करते, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
ऑल्टमन एका पॉडकास्टमध्ये बोलत होते. ‘चॅटजीपीटी’चे एक प्रॉम्प्ट चालवल्याने घराचा शॉवर सलग सहा तास चालू ठेवण्याइतके पाणी खर्च होते, असा आरोप करण्यात आला. त्यावर बोलताना ऑल्टमन यांनी हे विधान केले. ही व्हायरल होणारी गोष्ट एक ऑनलाइन गैरसमज असल्याचे सांगून ती फेटाळून लावताना ऑल्टमन यांनी युक्तिवाद केला, की प्रत्यक्षात संसाधनांच्या वापराचे प्रमाण खूपच कमी आहे. ‘अंदाजे ३८,००० चॅटजीपीटी प्रश्न हाताळण्यासाठी लागणारे पाणी हे कॅलिफोर्नियामध्ये एक बदाम पिकवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याइतकेच असते,’ असेही ते म्हणाले.

‘मी अनेकदा ही चर्चा ऐकली आहे. चॅटजीपीटीचा वापर करणे म्हणजे शॉवर सहा तासांसाठी चालू ठेवण्यासारखे आहे, असे दावे करण्यात येतात. माझ्याकडे सध्या अचूक आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु करण्यात येणारी चर्चा निरर्थक आणि खोटी आहे,’ असेही ऑल्टमन यांनी नमूद केले. ऑल्टमन यांनी संसाधनांच्या जागरूकतेबद्दल होत असलेल्या दुटप्पीपणाकडेही लक्ष वेधले. ‘सुरुवातीचे डेटा हब कूलिंग यंत्रणेवर अवलंबून होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जायचे. मात्र, आता आधुनिक सुविधांचा अवलंब होतो,’ असेही ऑल्टमन यांनी नमूद केले.

‘तुम्ही एखाद्या आधुनिक आणि खूप मोठ्या डेटा सेंटरकडे पाहिले, तर तेथे कार्यालयीन इमारतीइतकेच पाणी वापरले जाते. या पाण्याचा उपयोग स्वच्छतागृहे आणि अन्य गोष्टींसाठीही केला जातो. त्यामुळे चॅटजीपीटीचा वापर होत असताना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो, ही एक लोणकढी थाप आहे. ही बाब अनेकांनी तपासून पाहावी. तपासणीअंती छाननीत तथ्य आढळेल,’ असेही ऑल्टमन यांनी नमूद केले.