Death Of Two Students In Ashram School In Nashik District Pressure On Government From Tribal Organizations
आश्रमशाळांमधीलदोन विद्यार्थिनींचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी (दि. ४) नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. कळवण तालुक्यातील विसापूर येथील आश्रमशाळेतील दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून, विसापूर प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.
विसापूर (ता. कळवण) आश्रमशाळेत इयत्ता दुसरीतील सृष्टी ओंकार सूर्यवंशी या विद्यार्थिनीला गुरुवारी रात्री वसतिगृहातच ताप येऊन उलट्या झाल्याने रुग्णालयात नेत असताना, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी नाशिक शासकीय रुग्णालयात धाव घेऊन आदिवासी विकासमंत्री, आयुक्त आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी चौकशीचे आदेश देऊन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.दुसरी घटना त्र्यंबकेश्वर येथे घडली. त्र्यंबकेश्वरमध्येही शासकीय आश्रमशाळेतील लावण्या लहुदास भोंडवे (वय १३) या विद्यार्थिनीने आश्रमशाळेतून आल्यानंतर गणवेशाच्या ओढणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर आदिवासी विभागाने घटनेची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आदिवासी विकासमंत्री, सचिव व आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी मागे घेण्यात आले; मात्र आंदोलन कायम आहे.