भिवंडीतील गृहप्रकल्पात आधी स्वस्तात घर देण्याचे, नंतर शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्यासह आणखी एकाविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीचा एकूण आकडा २.९७ कोटी रुपये असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ठाण्यातील कोलशेत परिसरात तक्रारदार राहतात. त्यांचे वय ६४ वर्षे आहे. भिवंडीतील ‘पाच हजार रुपयांत घर’ या जाहिरातीला भुलून ते संबंधित फर्मच्या ठाणे शहरातील कार्यालयात गेले. तेथे फर्मचे मालक दाम्पत्य आणि व्यवस्थापक यांनी भिवंडीत १५ मजली इमारत बांधत असल्याची माहिती तक्रारदारांना दिली. त्यानंतर स्वस्तात घर मिळत असल्याने त्यांनी आठ घरे बुक केली. त्याकरिता ३५ लाखांहून अधिक रक्कम दिली. याबाबत संबंधित फर्म आणि तक्रारदार यांच्यात एमओयूही झाला होता. परंतु, फर्मकडून तक्रारदारांना काही रक्कम परत मिळाल्याने त्यांनी तीन एमओयू परत केले. तक्रारदारांच्या ओळखीतील इतर लोकांनीही या प्रकल्पात घर खरेदीसाठी पैसे गुंतवले. ती रक्कम २३ लाख ८० हजार रुपये आहे.फर्मच्या मालकाने बांधकाम व्यवसायाबरोबर शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करत असल्याचे सांगून, त्यामध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. वर्षभरानंतर मूळ रक्कम परत देण्याचे आश्वासन आरोपींनी दिल्याने तक्रारदारांसह त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे एक कोटी ८९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना ९२ लाख रुपये व्याजही मिळाले.
मात्र, नंतर पैसे मिळणे बंद झाले. विशेष म्हणजे, तक्रारदारांचे इतर नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनीही १ कोटी ५५ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंभीर बाब म्हणजे, गृहप्रकल्पाचे कामच सुरू करण्यात आले नाही. तसेच, गुंतवलेली रक्कम परत न करता तक्रारदारांची १ कोटी १७ लाखांची, तर त्यांच्या इतर परिचितांचीही १ कोटी ७९ लाखांची, अशी सुमारे २ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे.