थोरल्या संभाजी महाराजांच्या समाधीवर मेघडंबरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
grand meghdambari installed at the tomb of great sambhaji maharaj
स्वराज्यासाठी बलिदान देणारे थोरले छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्नाटकातील कनकगिरी येथील समाधिस्थळाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी ४०० किलो वजनाची पंचधातूची मेघडंबरी उभारण्यात आली.

विशेष म्हणजे, एका रात्रीत हे काम करण्यात आले. थोरल्या संभाजी महाराजांच्या या स्मृतिस्थळाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती.
धर्मवीर शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांनी श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह सहा लाख रुपये खर्च करून ही समाधिस्थळावर ही मेघडंबरी उभारली.

इतिहासातील नोंदीनुसार, अफजल खानाच्या कर्नाटक मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू श्री संभाजी महाराज यांचा घात झाला. त्यांची कर्नाटक राज्यातील कणकगिरी येथे समाधी बांधण्यात आली.

कर्नाटकातील ऐतिहासिक स्मृतिस्थळांच्या संवर्धनासाठी डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांची ही दुसरी मोहीम आहे. यापूर्वी कर्नाटकातील श्री शहाजी महाराजांच्या समाधीवरही मेघडंबरी उभारण्यात आली होती.

‘या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, संरक्षण आणि विकास यासाठी दोन्ही राज्य सरकारांनी लक्ष देण्याची गरज आहे. छत्रपती घराण्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारशी समन्वय साधून ठोस पावले उचलावीत,’ अशी मागणी घोडे यांनी केली.

गुरुदत्त शेळके, प्रदीप तिकोणे, श्रीकांत रेणके, अविनाश पवार, सुनील ढवळे, आदर्श कांबळे यांनी मेघडंबरी उभारण्याच्या या मोहिमेत सहभाग घेतला.