‘लोकसहभागातून मार्ग’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘लोकसहभागातून मार्ग’
गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या वाढत्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी मंडळे व नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ‘डीजे’मुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणापासून आपल्याला दूर जावेच लागेल, असे स्पष्ट करतानाच ‘भूकंप आल्यासारखा’ जाणवणारा आवाज टाळण्याबाबत बहुतांश घटकांमध्ये सहमती होत आहे. आगामी काळात हे स्तोम कमी होताना दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

फडणवीस हे विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ‘डीजे’बाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘’डीजे’च्या मुद्द्यावरून वेगवेगळे विचार असू शकतात; मात्र हिंसा कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. प्रत्येकाने आपला मुद्दा चर्चेतून मांडला पाहिजे. वर्षानुवर्षे रूढ झालेल्या काही पद्धती बदलताना केवळ कायद्याचा आधार न घेता लोकांना विश्वासात घेणे अधिक महत्त्वाचे आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात बहुतांश घटकांची सहमती

फडणवीस यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. ‘डीजे’मुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बहुतांश मंडळे आणि संबंधित घटकांमध्ये सहमती होत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा पुण्यात गणेशोत्सव आणि अन्य उत्सव चांगल्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील. लोकांच्या सहभागातून ‘डीजे’चे जे काही स्तोम निर्माण झाले आहे, ते कमी होताना दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.