लोकसहभागातूनच मार्ग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
लोकसहभागातूनच मार्ग
गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या वाढत्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी मंडळे आणि नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ‘डीजे’मुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनिप्रदूषणापासून आपल्याला दूर जावेच लागेल, असे स्पष्ट करतानाच ‘भूकंप आल्यासारखा’ जाणवणारा आवाज टाळण्याबाबत बहुतांश घटकांमध्ये सहमती होत आहे. आगामी काळात हे स्तोम कमी होताना दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस हे कार्यक्रमांसाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ‘डीजे’बाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘डीजे’च्या मुद्द्यावरून वेगवेगळे विचार असू शकतात; मात्र हिंसा कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. प्रत्येकाने आपला मुद्दा चर्चेतून मांडला पाहिजे. वर्षानुवर्षे रूढ झालेल्या काही पद्धती बदलताना केवळ कायद्याचा आधार न घेता लोकांना विश्वासात घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. ‘डीजे’मुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बहुतांश मंडळे आणि संबंधित घटकांमध्ये सहमती होत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा पुण्यात गणेशोत्सव आणि अन्य उत्सव चांगल्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील. लोकांच्या सहभागातून ‘डीजे’चे जे काही स्तोम निर्माण झाले आहे, ते कमी होताना दिसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

विविध ठिकाणी ‘डीजे’बाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी एकसमान धोरण करण्याबाबत विचारले असता, असे धोरण तातडीने तयार होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून डीजेच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर नेमकी काय कारवाई होते, हे आज, शनिवारी होणाऱ्या दहीहंडीमध्येच स्पष्ट होणार आहे. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी अनेक ठिकाणी मोठे ध्वनीक्षेपक लावून त्यावर गाणी लावली गेली होती. कोथरूड, मार्केट यार्ड, सहकारनगर, सिंहगड रस्ता अशा सर्वच उपनगरांमध्ये हेच वातावरण दिसून येत होते. काही ठिकाणी नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे आज पोलिस खरेच कारवाई करणार का ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘सण-उत्सव हे आनंददायी असावेत, मात्र आता ‘लष्कर-ए-उत्सवा’च्या दहशतीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे सर्वच धर्माचे सण-उत्सव, जयंती-पुण्यातिथी कार्यक्रमांमधील ध्वनिप्रदूषणाला माझा विरोध आहे. मारहाण केल्याने माझा निश्चय ढळणार नसून, ध्वनिप्रदूषणविरोधी लढा सुरूच राहील,’ असा निर्धार विद्यानंद बापट यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ‘माझ्या मुद्द्यांचा तार्किक प्रतिवाद करण्याऐवजी सवंग प्रसिद्धीसाठी मारहाणीसारखे माकडचाळे केले जात आहेत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

भंडारा : सण-उत्सव काळात भंडारा जिल्ह्यात डीजे आणि तत्सम उच्च क्षमतेच्या ध्वनिप्रणालींच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली. हे निर्बंध एक नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. परवानगी नसलेली ध्वनिप्रणाली बसविण्यासाठी वाहनांमध्ये फेरबदल करण्यासही मनाई करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाइट्सवर जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. पुण्यात डीजेबंदी कधी होणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.