Need For Continuous Efforts In Adoption Process Of Children With Special Needs
सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज : सक्सेना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) बालकांच्या दत्तक प्रक्रियेला व्यापक करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. २०२५-२६ मध्ये विशेष गरजा असलेल्या ३९४ बालकांना दत्तक देण्यात आले. २०२४-२५ मध्ये ही संख्या ३१३ होती,’ अशी माहिती राज्य दत्तक संसाधन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भावना सक्सेना यांनी दिली.
महिला व बालविकास विभाग आणि राज्य दत्तक संसाधन संस्थेच्या (सारा) वतीने पुण्यात कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा लड्डा, उपायुक्त वर्षा पवार; तसेच पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, गोवा; तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग असलेल्या या कार्यशाळेत ७४ पेक्षा अधिक जिल्ह्यांमधील सुमारे १५० संबंधित घटक उपस्थित होते.लड्डा म्हणाल्या, ‘दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नात्यांमध्ये दत्तक प्रक्रिया करतानाही कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. या प्रक्रियेमध्ये दत्तक प्रक्रियेला सुलभता येण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचा विचार करून कार्यपद्धती ठरविण्यात येईल. कार्यशाळेतून प्राप्त झालेल्या शिफारशी भविष्यातील हस्तक्षेप आणि विविध संबंधित यंत्रणांमधील समन्वय बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.’