Poor Construction Of Ambernath Municipal Building Forces Venue Change For Meeting
नाटक नव्हे पालिका सभा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अंबरनाथ पालिकेने ७० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या निकृष्ट कामाबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, आता पालिकेच्या सभागृहालाच गळती लागून पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे ४ सप्टेंबर रोजीची सर्वसाधारण सभा धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात घेण्याची नामुष्की पालिका आणि लोकप्रतिनिधींवर ओढवली आहे. त्यामुळे एकूणच नगरपालिका इमारतीच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे दोन मजले बांधून गेल्या दोन वर्षांपासून तेथून प्रशासकीय कारभार हाकला जात आहे, तर उर्वरित दोन मजल्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास ७० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांतच इमारतीच्या विविध भागांत प्लास्टर कोसळणे, शॉर्टसर्किट, वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे आणि छतातून गळती होणे, असे प्रकार घडत असल्याने इमारतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या सभागृहात आतापर्यंत केवळ दोनच सभा पार पडल्या आहेत. मात्र, सभागृहातील काही भागाचे प्लास्टर कोसळून पाणीगळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ४ सप्टेंबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा अखेर धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात आयोजित करण्याची नामुष्की प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर ओढवली आहे.