पुणे फेस्टिव्हल रंगणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
pune festival 2023 a cultural extravaganza and celebration
कला आणि संस्कृतीचा मनोहारी संगम असलेला ३८ वा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. महोत्सवाचे संस्थापक दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस हा महोत्सव अर्पण करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे महोत्सवाचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव’ तसेच निर्माते व दिग्दर्शक किरण शांताराम, दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्ष अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी अग्रवाल यांना ‘पुणे फेस्टिव्हल ॲवॉर्ड’ देण्यात येणार आहे.

‘उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महोत्सवाच्या पॅट्रन, अभिनेत्री हेमामालिनी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, सचिव डॉ. सतीश देसाई आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाचे विभागीय प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे उपस्थित होते.
नेहरू चौकातील रणमर्द शिवाजी मंडळ आणि कसबा पेठेतील हनुमान मंडळ प्रतिष्ठान या सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या मंडळांना प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे स्मृती ‘जय गणेश’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तुकाराम दैठणकर यांचे सुमधुर सनईवादन, शर्वरी जमेनीस आणि शिष्यांची कथकद्वारे गणेशवंदना, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या पन्नास विद्यार्थ्यांचे ‘महाराष्ट्र सन्मान गीत’, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतील भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांचा ‘वसुधैव कुटुंम्बकम’ नृत्याविष्कार, भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानिमित्त ‘चक दे इंडिया’ नृत्याविष्कार, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नृत्याविष्कार अशा रंगारंग कार्यक्रमांनी उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रींची’ प्रतिष्ठापना १४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल सारस येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते होईल. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उद्घाटन सोहळा, सुफी संगीत, केरळ महोत्सव, हिंदी हास्य कविसंमेलन, अशोक हांडे प्रस्तुत ‘मराठी बाणा’ आणि एम. एच. जे. लाइव्ह (हास्यजत्रा) हे प्रमुख कार्यक्रम होतील. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शने, विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. ‘अंधमुक्त पुणे’ चळवळीसाठी तिन्ही ठिकाणी विशेष कक्ष उभारून नेत्रदानाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.