शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य
‘बुद्धिबळ हा केवळ स्पर्धात्मक खेळ नसून, किशोरवयीन मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो,’ असा निष्कर्ष डॉ. मकरंद वेलणकर यांच्या पीएचडी संशोधनातून समोर आला आहे.

पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठ येथे ‘किशोरवयीन मुलांचा आत्मविश्वास आणि सारासार विचार करण्याची क्षमता यावर बुद्धिबळ प्रशिक्षणाचा होणारा परिणाम – एक वर्णनात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. डॉ. रश्मी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण झाले.
या अभ्यासात दहा ते १९ वर्षे वयोगटातील ६१२ विद्यार्थी आणि ४७८ पालक सहभागी झाले. एक ते तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ नियमित बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक-भावनिक थकवा कमी असल्याचे आढळले; तसेच मित्र, नातेवाईक किंवा सामाजिक माध्यमांतून अनौपचारिकरीत्या बुद्धिबळ शिकणाऱ्यांच्या तुलनेत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य अधिक असल्याचे स्पष्ट झाले.

नियमित बुद्धिबळामुळे धोरणात्मक विचार, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, अंदाज बांधण्याची क्षमता आणि आत्मविश्वास विकसित होत असल्याचे पालकांनी नमूद केले. विशेष म्हणजे, डॉ. वेलणकर यांनी संपूर्ण पीएचडी प्रबंध मराठीत सादर केला आहे.

डॉ. वेलणकर हे पुण्यातील पहिले नॅशनल आर्बिटर असून, बुद्धिबळ विषयावर पीएचडी करणारे पुण्यातील पहिले संशोधक आहेत. १९८६ पासून वेलणकर यांनी चेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. पुढील काळात ‘आत्मविकासासाठी बुद्धिबळ’, ‘चेस थेरपी’ आणि ‘बुद्धिबळ साक्षर अभियान’ राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. वेलणकर यांच्या संशोधनानुसार, दीर्घ काळ आणि नियमित बुद्धिबळ प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक अस्वस्थता कमी होऊन धोरणात्मक विचार, सारासार निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, एकाग्रता, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासाला चालना मिळत असल्याचे अभ्यासातून अधोरेखित झाले.

‘आत्मविकासासाठी बुद्धिबळ’ हा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला असून, ‘चेस थेरपी’ ही अभिनव संकल्पनाही विकसित केली आहे. हट्टीपणा, नैराश्य, समस्या सोडविण्याची क्षमता, सकारात्मक विचारसरणी, एकाग्रता, स्लो लर्नर्सचा विकास, धांदरटपणा कमी करणे आणि ‘मी जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होणार असल्याचा डॉ. मकरंद वेलणकर यांचा विश्वास आहे.