आपण असे का वागतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आपण असे का वागतो?
(लेखक ‘नाबार्ड’चे निवृत्त उपमहाव्यवस्थापक आहेत.)

ही वर्षांपूर्वी मुंबईतील जुन्या गडद तपकिरी आणि पिवळ्या रंगाच्या लोकल गाड्यांच्या जागी नवीन सीमेन्स लोकल आल्या, तेव्हा त्या चमकदार चंदेरी डब्यांकडे पाहताना आनंद व्हायचा. पण लवकरच त्या डब्यांवर एक वेगळीच ‘नक्षी’ दिसू लागली. दरवाजांच्या दोन्ही बाजूंना लालसर डाग आणि वडाच्या पारंब्यांसारख्या नारंगी रेषा पसरू लागल्या. पान-गुटखा खाऊन थुंकण्याच्या सवयीने त्या सुंदर डब्यांची अवस्था लालसर-तपकिरी घाणीने माखलेल्या डब्यांसारखी झाली. आपण कुठेही गेलो, तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. सफाई कामगाराने रेल्वे प्लॅटफॉर्म नुकताच झाडून स्वच्छ केलेला असतो, तोच कोणी तरी मोठ्याने घसा खाकरून तिथेच थुंकतो. अशा व्यक्तीला नम्रपणे समजावण्याचा प्रयत्न केला, तर ‘तुझ्या बापाचं काय जातंय?’ अशा प्रतिसादाची शक्यता अधिक.
हा प्रश्न केवळ थुंकण्यापुरता मर्यादित नाही. सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे वागण्याच्या आपल्या एकूणच सवयीचे हे प्रतिबिंब आहे. एखाद्या उद्यानातील बाकाखाली किंवा बस आणि ट्रेनच्या सीटखाली पाहिले, तर भुईमुगाच्या शेंगांची टरफले, बिस्किटांची वेष्टने, मोसंबीची साले आणि इतर कचरा साचलेला दिसतो. मात्र, हेच लोक आपल्या घराच्या ओटीवर कोणी थोडासा कचरा टाकला, तर भांडायला उठतात. स्वतःचे घर स्वच्छ ठेवायचे आणि बाहेर पडताच नागरी भान वाऱ्यावर सोडायचे, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. आपल्या वर्तनामुळे इतरांना त्रास होतो, आपण रोगराईला आमंत्रण देतो, याची अनेकांना फिकीर नसते.

रस्त्यावरील वाहतुकीचे उदाहरण घ्या. आपले अनेक वाहनचालक इतके असहिष्णू का असतात, हे कळत नाही. रस्त्यावर एखादी गाडी बंद पडली, तर मागील दहा गाड्यांचे चालक हॉर्न वाजवून प्रचंड गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण निर्माण करतात. हॉर्न वाजवून बंद पडलेली गाडी आपोआप सुरू होणार नाही, हे माहीत असूनही हा उतावळेपणा कमी होत नाही. ट्रॅफिक सिग्नलला आखलेल्या रेषेमागे थांबण्याची शिस्तही क्वचितच दिसते. अनेकजण सहा-दहा फूट पुढे जाऊन थांबतात. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून वाट काढावी लागते.

सिग्नल हिरवा होईपर्यंत शांतपणे थांबण्याची तयारीही कमीच. हिरवा सिग्नल लागायला दहा सेकंद बाकी असतानाच वाहने पुढे सरकू लागतात. बिबट्या सावजावर झडप घालण्याआधी जसा चोरपावलांनी पुढे सरकतो, तशी वाहने झेब्रा क्रॉसिंगवर येऊन उभी राहतात. जो नियम पाळून थांबतो, त्याला उलट मूर्ख समजले जाते. एकदा मी सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबलो होतो. मागील वाहनचालकांनी मला ओव्हरटेक करताना शिवीगाळ केली आणि पुढे निघून गेले. ‘लेन शिस्त’ म्हणजे स्वतःच्या लेनमध्ये राहणे, ही संकल्पनाच अनेकांना मान्य नसल्यासारखी वाटते. त्यामुळेच रस्ते अपघातांच्या बाबतीत आपला देश आघाडीवर असणे आश्चर्यकारक नाही.

हा उतावळेपणा किंवा असंयम केवळ अशिक्षित किंवा ग्रामीण लोकांपुरता मर्यादित नाही. विमानप्रवास करणारे तथाकथित सुसंस्कृत लोकही याला अपवाद नाहीत. विमानाचे बोर्डिंग सुरू झाल्याची घोषणा होताच काही प्रवासी गेटकडे ज्या घाईने धावतात, ते पाहून जणू एसटी बसमध्ये सीट मिळवण्यासाठी धाव घेतली आहे की काय, असे वाटते. बोर्डिंग पासवर सीट क्रमांक स्पष्ट दिलेला असतो. कधीही आत गेलात, तरी तीच सीट मिळणार असते; तरीही ही घाई का, हे समजत नाही. विमान उतरल्यावरही हाच प्रकार. विमान पूर्ण थांबून जिना किंवा एरोब्रिज जोडण्यासाठी काही मिनिटे लागतात. पण त्याआधीच प्रवासी डोक्यावरचे लगेज बिन उघडतात, सामान काढतात आणि पॅसेजमध्ये गर्दी करतात. अशा वेळी परदेशी प्रवासी अवाक होऊन पाहताना दिसतात. परदेशातही काही भारतीयांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण भारतीय पर्यटकांची प्रतिमा मलीन होते. थायलंडसारख्या ठिकाणी अत्यंत कमी किमतीत घासाघीस करण्याच्या प्रवृत्तीमुळे काही व्यापारी भारतीय पर्यटकांकडे संशयाने पाहतात. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जास्त मद्य मागणे, हवाई सेविकांशी उद्धटपणे वागणे, मुलांना आसनांवर उड्या मारू देणे, गटातील लोकांशी मोठमोठ्याने बोलणे, अशा तक्रारीही ऐकू येतात. प्रवासात मोकळेपणा असावा; पण तो इतरांच्या शांततेचा भंग करणारा नसावा. सार्वजनिक जागा ही आपली खासगी बैठक नाही, हे विसरले जाते.

नुकतीच एका विमानातील क्लिप व्हायरल झाली होती. त्यात एक महिला आपल्या गटातील दहा-पंधरा जणांना थेपले आणि ढोकळ्याच्या प्लेट्स वाटत फिरताना दिसत होती. आता विमानात गॅस सिलिंडर आणि शेगडी न्यायचीच बाकी राहिली आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. याहूनही गंभीर म्हणजे व्हिएतनाममधील एका विमानतळावर भारतीयांच्या एका गटाने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून थेट टारमॅकवर गरबा खेळल्याची बातमी आली होती. बँकॉक विमानतळावर इमिग्रेशनच्या रांगा तोडणे, रांगेत बॅग ठेवून नंतर दहा जणांना घेऊन येणे आणि ताटकळत उभ्या प्रवाशांना मागे ढकलणे अशा गैरवर्तनांच्याही नोंदी आहेत. चांगल्या वर्तनाच्या इतर भारतीयांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. हुल्लडबाज लोक संख्येने कमी असतील; पण त्यांच्या वागण्यामुळे संपूर्ण समुदायाची प्रतिमा खराब होते. काही वर्षांपूर्वी हाँगकाँगमधील शहर-सफरीदरम्यान आमच्या बसला एका हॉटेलसमोर भारतीय पर्यटकांच्या गटाची वाट पाहावी लागली. दहा मिनिटे, पंधरा मिनिटे, अर्धा तास उलटला. शेवटी टूर गाइडला विचारता, ‘भारतीय पर्यटक उशिरा येणे ही नेहमीची डोकेदुखी आहे,’ असे त्याने सांगितले. ते उशिरा उठले होते आणि तयार नव्हते. बराच वेळ झाल्यावर तो गट बाहेर आला आणि बसमध्ये बसण्याऐवजी आणखी फोटो काढण्यात वेळ घालवू लागला. शरमेने डोके खाली गेले. नंतर मकाऊमध्ये दुसऱ्या एका भारतीय गटानेही याचाच कित्ता गिरवला.

सार्वजनिक ठिकाणी मोठा गोंधळ करणे, मातृभाषेत इतरांबद्दल टोमणे मारणे, रांगा मोडणे आणि स्वतःच्या सोयीला इतरांच्या हक्कांपेक्षा वरचे स्थान देणे, या सवयींमुळे भारतीय पर्यटकांकडे पूर्वग्रहाने पाहिले जाते. भारतात असताना जातीयवादी विष पसरवणारे, सणासुदीला डीजे आणि फटाक्यांनी लोकांना हैराण करणारे, डॉक्टरांवर हल्ले करणारे आणि अशा हरकतींना अप्रत्यक्ष सामाजिक वा राजकीय संरक्षण मिळते, असे मानणारे काही लोक तीच गुर्मी परदेशातही घेऊन जातात. परंतु परदेशात नियम कडक असतात आणि सामाजिक शिस्तीची अपेक्षाही अधिक असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

भारतीय जगभर प्रवास करतात, खर्च करतात आणि परदेशी अर्थव्यवस्थांनाही हातभार लावतात, हे खरे; पण पैशांबरोबर सभ्यता आणि शिस्तही महत्त्वाची असते. पर्यटक म्हणून आपण फक्त स्वतःचे प्रतिनिधित्व करत नाही; आपण देशाची प्रतिमाही घेऊन फिरत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी संयम, स्वच्छता, रांगेची शिस्त, वाहतुकीचे नियम, आवाजाचे भान आणि इतरांचा विचार या साध्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे. परदेशात आपली प्रतिमा बदलण्याची तातडीची गरज आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वदेशातच आपल्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. स्वच्छता, संयम, शिस्त आणि संवेदनशीलता या गोष्टी घरापासून, रस्त्यापासून, रेल्वे-प्लॅटफॉर्मपासून आणि विमानतळापर्यंत आचरणात आणल्या, तरच आपण जबाबदार, नागरी भान असलेले नागरिक ठरू.

(लेखक ‘नाबार्ड’चे निवृत्त उपमहाव्यवस्थापक आहेत.)