दीक्षाभूमी अध्यक्षपदाचा वाद शमेना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
dispute over dikshabhoomi presidency conflict between bhadant surei sasai and vilas gajghate
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून वाद पुन्हा उफाळून आला. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला हवाला देत सोमवारी भदंत सुरेई ससाई यांनी आपण अध्यक्ष असल्याचा दावा केला. मंगळवारी विलास गजघाटे यांनी निवेदन काढून आपणच अध्यक्ष असल्याचे सांगितले.

दीक्षाभूमीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे नाव नोंदविण्यात आले आहे. सध्या उपलब्ध अधिकृत नोंदीनुसार अध्यक्षपद भदंत ससाई यांच्याकडेच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच नोंदीनुसार समितीच्या सचिवपदी डॉ. सुधीर फुलझेले यांचे नाव आहे, असा दावा करणारे पत्र भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सोमवारी प्रसिद्ध केले. हा दावा गजघाटे यांनी खोडून काढला.
‘२० फेब्रुवारी २०२६ आणि १२ मे २०२६ रोजी धर्मादाय उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विश्वस्त मंडळाची सभा २२ जून २०२६ रोजी घेण्यात आली. या सभेत बहुमताने भदंत सुरेई ससाई यांना समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदावरून काढण्याचा ठराव सर्व विश्वस्तांनी एकमताने मंजूर केला होता. त्यासंबधीचा चेंज रिपोर्ट धर्मादाय उपायुक्तांकडे २४ जून २०२६ रोजी दाखल केला होता’, अशी माहिती गजघाटे यांनी दिली.

भदंत नागार्जुन सुरेई ससाई यांनी मागील तीन वर्षांपासून कार्यकारी समितीच्या नियमित सभा घेतल्या नाहीत. समितीच्या महत्त्वाच्या प्रशासकीय व आर्थिक निर्णयांमध्ये कार्यकारी समितीला विश्वासात घेतले नाही. आर्थिक व्यवहारांची माहिती नियमितपणे समितीसमोर सादर करण्यात आलेली नाही. दीक्षाभूमीच्या विकासकामांमध्ये अनेक अडथळे निर्माण केलेत. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून काढण्यात आले. विशेष म्हणजे समितीच्या आठ विश्वस्तांनी धर्मादाय उपायुक्तांकडे तत्कालीन अध्यक्ष भदंत ससाई यांच्या विरोधात ‘४१–डी’चा खटलासुद्धा दाखल केला आहे, अशी माहिती गजघाटे यांनी दिली.