डीजे’, ‘प्रेशरमीड’ आणि ‘प्लाझ्मा’ म्हणजे नेमके काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
डीजे’, ‘प्रेशरमीड’ आणि ‘प्लाझ्मा’ म्हणजे नेमके काय?
‘डीजे’ म्हणजे काय?

‘डीजे’ हा मुळात कोणत्याही एका ध्वनिक्षेपकाचा प्रकार नाही. ‘डिस्क जॉकी’ या शब्दाचे ते संक्षिप्त रूप आहे. गाणी किंवा संगीत निवडणे, वेगवेगळ्या गाण्यांचे मिश्रण करणे, आवाजाची पातळी वाढवणे-कमी करणे आणि कार्यक्रमाच्या वातावरणानुसार संगीत सादर करणे, हे डीजेचे काम असते. सध्या मात्र ‘डीजे’ म्हणजे संपूर्ण ध्वनिक्षेपक यंत्रणा , असा अर्थ घेतला जातो. या यंत्रणेत मिक्सर, ॲम्प्लिफायर, स्पीकर, सबवूफर, प्रेशरमीड , प्लाझ्मा आणि अन्य उपकरणे असतात.
प्रेशरमीड म्हणजे काय?

‘प्रेशरमीड’ हा मधल्या वारंवारितेतील आवाज अधिक ताकदीने प्रक्षेपित करणारा ध्वनिक्षेपकाचा भाग असतो. गाण्यांतील शब्द आणि अनेक वाद्यांचे सूर या मधल्या पट्टीत येतात. या पट्टीतले आवाज सामान्य स्पीकरच्या तुलनेत अधिक दाबाने प्रक्षेपित करणाऱ्या मिड रेंज युनिटला साउंड सिस्टीमच्या व्यवसायात ‘प्रेशरमीड’ म्हटले जाते. यातून येणारा आवाज कानांना टोचणारा आणि शरीराला जाणवणारा असू शकतो. ‘प्रेशरमीड’ ही सर्वत्र मान्य असलेली स्वतंत्र तांत्रिक वर्गवारी नसून, ध्वनिक्षेपक व्यवसायात प्रचलित झालेली संज्ञा आहे.

प्लाझ्मा म्हणजे काय?

स्थानिक साउंड सिस्टीममध्ये विशिष्ट प्रकारच्या मोठ्या आणि शक्तिशाली स्पीकर बॉक्ससाठी ‘प्लाझ्मा’ हा शब्द वापरला जातो. अशा उपकरणांमधून तीव्र, कर्कश किंवा उच्च क्षमतेचा आवाज निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी ‘प्लाझ्मा’ हा शब्द उच्च तीव्रतेच्या ध्वनियंत्रणेसाठीही वापरला जातो. या उपकरणांची रचना सर्व ठिकाणी सारखी नसते; त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाची वारंवारिता आणि तीव्रता उपकरणाच्या प्रकारानुसार बदलू शकते. ‘प्लाझ्मा’ हा शब्द वापरला जात असला, तरी प्रत्यक्ष उपकरणाची क्षमता आणि त्यातून निर्माण होणारा आवाज तपासणे महत्त्वाचे ठरते.

मिक्सर आणि बेस म्हणजे काय?

मिक्सर हे ध्वनी नियंत्रित करणारे उपकरण आहे. मायक्रोफोन, संगणक, मोबाइल किंवा वाद्यांमधून येणारे वेगवेगळे आवाज मिक्सरमध्ये एकत्र केले जातात. त्यांची तीव्रता, सूर, प्रतिध्वनी आणि परस्परांचे संतुलन मिक्सरच्या साह्याने नियंत्रित करता येते.

‘बेस’ म्हणजे कमी वारंवारतेचा, खालच्या पट्टीतील आणि धडधडणारा आवाज. ढोलाचा घुमणारा आवाज किंवा गाण्यातील ठेका प्रामुख्याने बेसमुळे जाणवतो. हा आवाज केवळ ऐकू येत नाही, तर शरीराला त्याची कंपने जाणवतात. बेससाठी सबवूफरचा वापर केला जातो.

डेसिबल म्हणजे काय?

डेसिबल किंवा ‘डीबी’ हे आवाजाची पातळी मोजण्याचे एकक आहे. मोठा आवाज म्हणजे अधिक डेसिबल. निवासी क्षेत्रात सर्वसाधारणपणे दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिली आहे. आवाजाचा परिणाम डेसिबलखेरीज तो किती वेळ ऐकू येतो, किती अंतरावरून येतो आणि त्याची वारंवारता किती आहे, यावरही अवलंबून असतो.