गुन्हा मागे घ्या, अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
vishwa hindu parishad threatens to protest if charges are not dropped
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डीजेचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने मंगळवारी दिला. शोभायात्रेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या चित्ररथाला बजावण्यात आलेली नोटीस रद्द करण्याची मागणी विहिंपने पत्रपरिषदेत केली.

परिमंडळ क्रमांक-२च्या पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी पूर्वग्रहातून कारवाई केल्याचा आरोप विहिंपचे महानगरमंत्री अमोल ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला. ते म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिस आयुक्तांना देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. अन्नपूर्णा सिंह यांनी मोबाइलवरून डीजेच्या आवाजाची पातळी तपासून शोभायात्रा थांबविण्याचा प्रयत्न केला. काही वाहनांच्या चाव्याही काढून घेतल्या. डीजेच्या आवाजाची पातळी तपासण्यासाठी अधिकृत डेसिबल मोजणी यंत्राऐवजी मोबाइलचा वापर केला. शहरातील इतर भागांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या दहीहंडी कार्यक्रमांत डीजे तसेच लेझर लाइटचा वापर करण्यात आला होता. त्या कार्यक्रमांमध्येही मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक वाजविण्यात आले. त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल विहिंपने केला.
पत्रकार परिषदेला विहिंपचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, प्रांत मंत्री प्रशांत तितरे, प्रांत प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार, महानगर सहमंत्री राजू पवनारकर, नीलकांत गुप्ता तसेच बजरंग दलाचे नागपूर महानगर संयोजक शुभम अरखेल उपस्थित होते.

शहर पोलिस आयुक्तांनी नियमबाह्य पद्धतीने डीजे वाजविण्यास तसेच हानिकारक लेझर लाइट वापरण्यास मनाई करणारी अधिसूचना काढली आहे. यावरून शहरात मते-मतांतरे व्यक्त होत आहेत.

शोभायात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष चित्ररथ साकारण्यात आला होता. हा चित्ररथ तयार करणाऱ्या कारागिराला सामाजिक तेढ निर्माण होत असल्याच्या कारणावरून नोटीस बजावण्यात आली. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमातील चित्ररथाला अशा प्रकारे नोटीस बजावणे निषेधार्ह असल्याचे ठाकरे म्हणाले.