Users To Get Option To Exit Algorithm On Social Media
‘अल्गोरिदम’मधून बाहेर पडता येणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आशयावर वापरकर्त्यांना अधिक नियंत्रण मिळावे, यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने नव्या कायद्यांचा प्रस्ताव मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार १६ वर्षांवरील वापरकर्त्यांना अल्गोरिदमच्या आधारे तयार होणाऱ्या ‘पर्सनलाइज्ड फीड’मधून बाहेर पडण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
‘वापरकर्त्यांनी फीडमध्ये काय पाहायचे, याबाबत खरा आणि कायमस्वरूपी पर्याय देणारी साधने सोशल मीडिया कंपन्यांना उपलब्ध करून द्यावी लागतील,’ असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितले. नव्या कायद्यांतर्गत या कंपन्यांना वापरकर्त्यांना त्यांच्या ‘डिफॉल्ट फीड’बाबत पर्याय देणारी सूचना पाठवावी लागणार आहे. वापरकर्त्यांना अल्गोरिदमच्या मदतीने वैयक्तिक आवडीनुसार कंटेंट पाहण्याचा पर्याय स्वीकारता येईल. अथवा, त्यांनी स्वतः निवडलेले मित्र आणि कंटेंट निर्मात्यांच्या पोस्टच पाहता येतील.मुलांना खाण्याच्या विकारांना प्रोत्साहन देणारा आशय, महिलांविरोधातील द्वेषपूर्ण विचार, अश्लील साहित्य, गुन्हेगारी, धोकादायक स्टंट; तसेच गंभीर मानसिक तणाव निर्माण करणाऱ्या कंटेंटपासून संरक्षण देणे डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी बंधनकारक असेल. ऑनलाइन गेम्स, मोबाइल ॲप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट्सनाही नकारात्मक परिणाम करणाऱ्या रचनात्मक वैशिष्ट्यांपासून त्यांचे संरक्षण करावे लागेल. व्यसनाधीन करणारा आशय आणि आत्मसन्मानावर परिणाम करणाऱ्या डिझाइनवरही नियंत्रण आणले जाणार आहे. नियमभंग केल्यास मोठा दंड असून, या प्रस्तावामुळे वापरकर्त्यांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल आणि निष्क्रियतेबद्दल मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना जबाबदार धरता येईल. कायद्याचे पालन न केल्यास त्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल, असे अल्बानीज यांनी सांगितले. प्रस्तावित ‘डिजिटल ड्युटी ऑफ केअर’ कायद्यानुसार नियमभंगाबाबत सुमारे सात कोटी ८६ लाख अमेरिकी डॉलरपर्यंत दंड होऊ शकतो.