National Lokadalat Organized On September 12 In Nagpur District
१२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित तसेच दाखलपूर्व तडजोडीस पात्र प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.
सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा समिती आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत होणार आहे. जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच अन्य न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये तिचे आयोजन केले जाणार आहे. लोकअदालतीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणांसह मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, महसुली प्रकरणे, वैवाहिक वाद, बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित वसुलीची प्रकरणे तसेच अन्य प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढता येणार आहेत. वाद मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांचे मंडळ पक्षकारांना मदत करणार आहे. प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात, तर दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव प्रवीण मो. उन्हाळे व नागपूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल यांनी केले आहे.