मेरा म्हटले की तो हातांमध्येच वागवायला हवा, ही संकल्पना आता जुनी झाली. कॅमेरा आता हातात असण्याची गरज नाही. तो आता डोळ्यांवरही आला आहे. मात्र या तंत्राबाबतचा धोका दाखवून देणारी एक घटना एक जानेवारी २०२५ रोजी घडली होती. अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरातील फ्रेंच क्वार्टर परिसर. एका व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवला. यात १४ जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोर शम्सउद्दिन जब्बारने काही आठवडे आधी स्मार्ट चष्मा वापरून परिसराची पाहणी करताना चित्रफीत केली होती. हल्ल्याच्या वेळीही त्याने तो चष्मा घातला होता. अमेरिकेच्या फेडरल तपास यंत्रणेच्या तपासात ही बाब समोर आली. यातून एका नव्या धोक्याचा इशारा मिळतो. छायाचित्रे घेण्यासाठी, फोन करण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संवाद साधण्यासाठी बनवलेले हे ग्राहकोपयोगी तंत्रज्ञान एखाद्या ठिकाणाची गुप्त पाहणी करण्यासाठीही वापरले जाऊ शकते.
स्मार्ट चष्म्याची कल्पना आजची नाही. २०१३मध्ये ‘गुगल ग्लास’ने या क्षेत्राकडे जगाचे लक्ष वेधले. मात्र, त्याचा पारंपरिक चष्म्यापेक्षा वेगळा दिसणारा आकार, मर्यादित उपयोग आणि गोपनीयतेबाबत निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे तो सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकला नाही. पण, आज परिस्थिती वेगळी आहे. नवीन पिढीतील स्मार्ट चष्मे दिसायला जवळपास सामान्य चष्म्यांसारखे आहेत. त्यात कॅमेरा, ऑडिओ, मायक्रोफोन आणि एआय आहे. त्यामुळे तो वापरणाऱ्या व्यक्तीला खिशातून फोन काढण्याची गरज नाही. मेटानेच दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या एआय स्मार्ट चष्म्यांचा वापर दररोज लाखो लोक करत आहेत.या स्मार्ट चष्म्यांमुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. या चष्म्यातून एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडीओ घेताना त्या व्यक्तीला ते कळते का? तिला नकार देण्याची संधी मिळते का? आणि तिने नकार दिला, तरी रेकॉर्डिंग थांबवले जाईल याची खात्री देता येईल का? मेटा म्हणते... या समस्येची जाणीव ठेवून आम्ही आमच्या रेबॅन मेटा चष्म्यांमध्ये बाहेरच्या बाजूला ‘कॅप्चर एलइडी’ दिला आहे. फोटो किंवा व्हिडीओ चित्रित करताना हा दिवा इतरांना रेकॉर्डिंग सुरू असल्याचे संकेत देतो. यातला एलइडी झाकण्याचा किंवा त्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास कॅमेरा निष्क्रिय करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपायही करण्यात आले आहेत, असेही मेटाने म्हटले आहे.
पण, हे सुरक्षा उपाय पुरेसे आहेत का? एखादा छोटा एलईडी दिवा तांत्रिकदृष्ट्या रेकॉर्डिंग इंडिकेटर असू शकतो; पण, गर्दीच्या ठिकाणी तो दिवा दिसेल का? समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ माहिती आहे का? आणि रेकॉर्डिंग सुरू आहे की नाही हे ओळखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या चष्म्याकडे बघत राहणे अपेक्षित आहे का? स्मार्ट चष्मे म्हणजे चालते-फिरते सेन्सर आहेत. ‘टेक टार्गेट’ या तंत्रज्ञान माध्यम कंपनीच्या ऑगस्ट २०२६मधील विश्लेषणानुसार, स्मार्ट चष्मे आता कॉर्पोरेट जगतासाठी धोका म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कंपनी आपल्या अहवालात गोपनीय रेकॉर्डिंग, माहितीची चोरी, बौद्धिक संपदा, कंप्लायन्स आणि कामाच्या ठिकाणचे खासगीपण (वर्कप्लेस प्रायव्हसी) यांसारखे धोके अधोरेखित केले आहेत. एखाद्या कंपनीच्या बैठकीत कर्मचारी स्मार्ट चष्मा घालून बसला आहे. त्याच्या दृष्टीसमोर येणारी माहिती संवेदनशील असू शकते. कंपनीची रणनीती, ग्राहकांची माहिती, उत्पादनाची रचना, संशोधनाची कागदपत्रे किंवा एखाद्या नवीन उत्पादनाचा नमुना ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांसमोर खुली होऊ शकते.
या चष्म्यांमधील एआयमुळे सुरक्षेचा प्रश्न आणखी मोठा होतो. हा चष्मा केवळ वापरकर्ता काय पाहतो, एवढेच लक्षात घेत नाही, तर तो वापरकर्ता काय पाहत आहे, याचे विश्लेषण करण्यास सुरुवात करतो. यामुळे सर्वसामान्य माणसाची गोपनीयता, त्याचे खासगीपण धोक्यात येऊ शकते.
स्मार्ट चष्मे स्वस्त, लहान आणि सामान्य दिसू लागले तर त्यांचा वापर वाढणार आहे. त्याच वेळी कॅमेरा तंत्रज्ञान, एआय आणि क्लाऊड कम्प्युटिंग अधिक शक्तिशाली होत आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणची ‘गोपनीयतेची अपेक्षा’ हळूहळू बदलू शकते. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसलेली व्यक्ती, जिममध्ये व्यायाम करणारा ग्राहक, शाळेतील विद्यार्थी, रुग्णालयातील रुग्ण किंवा कार्यालयातील कर्मचारी यांनी प्रत्येक वेळी स्मार्ट चष्मा आपल्याला पाहत तर नाही ना या भीतीखाली वावरायचे का?
मुंबईत २६/११मध्ये झालेला दहशतवादी हल्ला केवळ बंदुका आणि स्फोटकांचा हल्ला नव्हता. त्यामागे लक्ष्यांची पूर्वपाहणी, भौगोलिक माहिती, मार्गांची आखणी आणि संपर्काच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होता. नंतरच्या तपासात जीपीएस उपकरणे आणि सॅटलाइट फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक साधनांचे पुरावे समोर आले. यामुळे आजच्या एआयआधारित स्मार्ट चष्म्यांकडे पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, अशी उपकरणे भविष्यात दहशतवाद्यांची शस्त्रे बनू शकतील का? याचे उत्तर होय, असेच द्यावे लागेल.
स्मार्ट चष्म्यांच्या वापराबाबत भारताने अद्याप स्वतंत्र, सर्वसमावेशक कायदा केलेला नाही. मात्र, हा चष्मा वापरण्यासाठी कोणतेही नियमच नाहीत, असे नाही. आधीपासून असलेले गोपनीयता, माहिती-सुरक्षा आणि गुन्हेगारी कायदे काही प्रसंगी लागू होऊ शकतात. महाराष्ट्र सरकारने मात्र ऑगस्ट २०२६मध्ये स्मार्ट चष्मे आणि कॅमेरा असलेल्या इतर उपकरणांच्या वापराबाबत नियम तयार करण्यासाठी समिती नेमली आहे. या स्मार्ट चष्म्यांचा वापर फोटो किंवा व्हिडीओ काढणे, आवाज रेकॉर्ड करणे, थेट प्रक्षेपण, चेहरा ओळखणे, माहिती गोळा करण्यासाठी कसा होऊ शकतो आणि त्यातून लोकांची गोपनीयता किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो का? याचा विचार ही समिती करणार आहे.
जगभरात काही देशांमधील सरकारेही या चष्म्यांबाबत विचार करत आहेत. सिंगापूरने सध्या विद्यमान गोपनीयता कायदे स्मार्ट चष्म्यांनाही लागू होतात, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेत स्मार्ट चष्मे वापरणे सर्वसाधारणपणे बेकायदा नाही. पण त्याचा वापर करून तुम्ही काय करता, त्यावर आधीपासून अस्तित्वात असलेले कायदे लागू होऊ शकतात. इंग्लंड आणि वेल्समध्ये एक महत्त्वाचा प्रत्यक्ष निर्बंध आला आहे. न्यायालयांच्या इमारतींमध्ये मेटा स्मार्ट चष्म्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
स्मार्ट चष्म्यांकडे केवळ स्पायिंगसाठी म्हणून किंवा मनोरंजनाचे उपकरण म्हणून पाहता येणार नाही. दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसाठी ते वरदान ठरणार आहेत. या चष्म्याच्या आधारे त्यांना आजूबाजूच्या वस्तूंचे वर्णन मिळणे, मजकूर ओळखणे किंवा काही परिस्थितीत दृश्य माहितीची ऑडिओ माहिती मिळू शकणार आह. त्यामुळे त्यांचे स्वावलंबन वाढू शकते. कामाच्या ठिकाणीही हात न लावताही कम्प्युटरचा उपयोग करता येऊ शकतो. एखादा तंत्रज्ञ मशीन दुरुस्त करताना दोन्ही हात मोकळे ठेवून दूरच्या तज्ज्ञाशी संवाद साधू शकतो. प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष काम करताना मार्गदर्शन घेऊ शकतात. काही व्यावसायिक प्रक्रियांमध्ये फोन किंवा टॅब्लेटकडे वारंवार पाहण्याची गरज कमी होऊ शकते.