एक निवृत्त सेना अधिकारी आहे. ‘द डर्टी डझन’ हा चित्रपट पाहिल्यानंतर ज्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे, ते पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली. लेखक ई. एम. नाथनसन लिखित हे पुस्तक शोधण्यासाठी मी संपूर्ण दिल्ली पालथी घातली. अखेर ते पुस्तक मला लाल किल्ल्याच्या मागं रविवारी भरणाऱ्या जुन्या बाजारात एका भंगार विक्रेत्याकडं मिळालं.
लेखकानं कथानकाचा प्लॉट अशा प्रकारे रचला आहे, की एकदा पुस्तक हाती घेतलं, की ते पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावं वाटत नाही. कथानकाची पार्श्वभूमी लष्कराशी संबंधित असल्यामुळे आपण स्वतःच त्या कथानकाचा भाग आहोत, असा भास होत राहतो.या कथेत एक तरुण ऑफिसर एका मोठ्या आणि अत्यंत धोकादायक मोहिमेसाठी बारा कैद्यांची निवड करतो. हे कैदी कोर्ट मार्शलद्वारे मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेले, क्रूर आणि अपराधी असतात. त्या मोहिमेत मृत्यूची शक्यता मोठी असते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना सांगतात, की युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग आणि यश मिळालं, तर राज्य प्राप्त होईल. त्याच धर्तीवर तो अधिकारी त्या कैद्यांना सांगतो, ‘तुम्ही तसेही मरणार आहात. त्यापेक्षा देशासाठी मृत्यू आला, तर तुमची पापं धुतली जातील आणि तुम्हाला हुतात्मा म्हणून गौरवले जाईल.’ अशा प्रकारे तो अधिकारी त्यांना प्रेरित करतो आणि आपली मोहीम यशस्वी करतो.
आमच्या युनिटमध्येही असाच एक तुसड्या स्वभावाचा जवान पोस्टिंगवर आला होता. त्याला यापूर्वी दोनदा शिक्षा झाली होती. तिसरी शिक्षा झाली असती, तर त्याला नोकरीतून बरखास्त केलं गेलं असतं. तो कुणाचंच ऐकत नव्हता आणि कामही नीट करत नव्हता. आमच्या कमांडिंग ऑफिसरनी त्याला तिसरी शिक्षा करून घरी पाठवण्याची तयारी केली.
मी त्याच्याशी एकांतात बोललो आणि त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली. तेव्हा मला जाणवलं, की तो चांगला शिकलेला, गुणी, संवेदनशील आणि कुटुंबवत्सल माणूस आहे. मी त्याला माझ्या कंपनीत घेतलं. त्याला जबाबदाऱ्या दिल्या आणि कठीण कामगिरी सोपवली. त्यानं त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्याला पुढील प्रमोशन शक्य नव्हतं; मात्र, त्यानं उर्वरित दोन वर्षांची सेवा अत्यंत उत्तम रीतीनं पूर्ण केली आणि पेन्शन घेऊन सन्मानानं निवृत्त झाला. एक्सरसाइजला जाताना मी त्याला अॅडव्हान्स पार्टीमध्ये सोबत घेत असे.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याला मासेमारी उत्तम प्रकारे येत होती. पंजाबमध्ये सैनिकांना स्थानिक पातळीवर खूप मदत मिळायची. त्या जवानानं एकदा तलावातून ६० किलो मासे पकडून आणले. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. आमचे सीओ; जे त्याला शिक्षा करणार होते, त्यांनीच सैनिक संमेलनात त्याचं भरभरून कौतुक केलं. तो निवृत्त झाला तेव्हा युनिटकडून त्याला भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. मला प्रामाणिक जवानाची नोकरी वाचवल्याचं समाधान मिळालं.