Arrest Of Seven Youths In The Case Of The Murder Of A Manipuri Musician In Delhi
मणिपुरी संगीतकाराचा झुंडबळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘गोंगाट करू नका,’ असे सांगण्यास गेलेले मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रमसिंह यांच्यावर तरुणांच्या टोळक्याने दिल्लीत प्राणघातक हल्ला केला. घराच्याच कॉरिडोरमध्ये झालेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सात तरुणांना अटक झाली.
विक्रमसिंह (वय ५४) हे मणिपूरचे सुप्रसिद्ध गिटारवादक आणि संगीत शिक्षक होते. ते गेल्या १७ वर्षांपासून दिल्लीत संगीत शिकवत होते. ते दिल्लीतील किलोकरी गावात पत्नी जोशना चोंगथम आणि मुलगा याइफाबा चोंगथम (वय २०) यांच्यासोबत राहत होते. त्यांच्या घराच्या खाली रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास काही जणांचे टोळके जोरजोरात ओरडत होते. विक्रमसिंह यांनी त्यांना, ‘मोठ्याने आवाज करू नका,’ असे सांगताच आठ जणांनी त्यांचा पाठलाग करून घराच्या कॉरिडोरमध्ये अमानुष मारहाण केली.गंभीर जखमी झालेल्या विक्रमसिंह यांचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पाळत आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. भरतकुमार (वय १९), प्रमोद (वय २६), रमजान खान (वय २२), विजय (वय ३६), दीपांशू (वय २१), मोहन विश्वकर्मा (वय ३२) आणि मन्नू (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. एका अल्पवयीन मुलाचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही ‘एक्स’वर या हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करून सखोल चौकशीची मागणी केली. किलोकरी भागातील शेकडो स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, ‘विक्रमसिंह यांच्या हत्या प्रकरणात आठ ते नऊ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल,’ असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी सांगितले.
विक्रमसिंह यांच्या हत्येवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन कर्गे व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.