खड्डे, रस्तेकामांमुळे नाशिकसाठी ‘दिल्ली दूर’च

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
खड्डे, रस्तेकामांमुळे नाशिकसाठी ‘दिल्ली दूर’च
  देशभर गाजत असलेल्या नाशिकमधील खड्ड्यांमुळे काय होईल याचा नेम नाही. शहरातील खड्डे व रस्त्यांच्या कामांमुळे अनेकांचे विमान हुकल्याच्या घटना घडल्या असून, विशेषत: सायंकाळच्या दिल्ली विमानाच्या प्रवाशांना अधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. ओझर विमानतळाकडे जाताना दहावा मैल येथे राष्ट्रीय महामार्गावरही रस्त्याचे काम सुरू आहे. याशिवाय नाशिक शहरात निरनिराळ्या भागांतील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे, खड्डे व वाहतूक कोंडी यामुळे शहरातील प्रवासाचा वेळ वाढला आहे.
ओझर विमानतळ येथून सध्या नवी दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद व बेंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे. दिल्लीव्यतिरिक्त अन्य तिन्ही विमानांची उड्डाणे सायंकाळी पाचच्या आत आहेत. दिल्ली विमानाची नाशिकहून प्रयाणाची वेळ रात्री ८.५०ची आहे. हे विमान गाठण्यासाठी घर ते विमानतळाच्या प्रवासाला लागणारा नेहमीचा वेळ गृहीत धरला जातो. मात्र, सायंकाळची वाहतूक, खड्डे व रस्ताकामे, मुंबई नाका, द्वारका, अशोकस्तंभ येथे होणारी कोंडी यांमुळे विमानतळावर पोहोचण्यास उशीर होतो. दिल्लीच्या प्रवाशांना विमानतळ कर्मचाऱ्यांकडून रात्री ८.१५ नंतर विमानात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांत खटके उडतात.