‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘ यूपीआय ’ ही देशात विकसित झालेली पेमेंट प्रणाली आज अनेक देशांत पोहोचली आहे, पण ही पहिली पायरी झाली. आता या देशांच्या पेमेंट प्रणालीमध्ये शिरकाव करणे हे आपले पुढचे लक्ष्य असेल,’ असे सांगून ‘यूपीआय’ जगभरात पोहोचवण्यासाठी फिनटेक उद्योजकांनी कामाला लागावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ या वित्ततंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन केल्यावर मोदी बोलत होते. ‘यूपीआय प्रणाली सिंगापूरच्या पेमेंट प्रणालीसोबत आपण जोडली आहे. त्यामुळे जणू एकाच शहरातील दोन गल्ल्यांमध्ये सहजतेने व्यवहार होतात तसे भारत आणि सिंगापूर दरम्यान होत आहेत. भारत ज्या देशांबरोबर मोठ्या प्रमाणावर व्यापार करतो किंवा ज्या देशात भारतीय मोठ्या प्रमाणावर राहतात त्या सर्व देशांत आपल्याला यूपीआय घेऊन जायची आहे. त्यासाठी इथून पुढच्या काळात आपल्याला काम करावे लागेल,’ याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.‘जे देश यामध्ये आपल्याबरोबर यायला तयार असतील त्यांच्याबरोबर आपल्याला काम करावे लागेल. परदेशांतून मोठ्या संख्येने भारतीय काम करतात आणि तेच सर्वाधिक प्रमाणावर भारतात पैसे पाठवतात. मात्र, असे करताना त्यांच्या पैशाचा मोठा भाग हा व्यवहारशुल्काच्या रूपाने खर्च होतो. परदेशस्थ भारतीयांना यामध्ये बचत करून द्यावी आणि त्यायोगे अधिकाधिक पैसा भारतात आणावा,’ असे मोदी म्हणाले.
‘ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये येण्याचे यंदाचे माझे सलग तिसरे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी फिनटेक क्षेत्रात तरुण उद्योजकांची संख्या वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस ऊर्जा वाढताना दिसत आहे. शक्यतांची कक्षा विस्तारताना दिसते आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे, की जोखीम घेण्याची क्षमता वाढत आहे. स्वप्ने अधिकाधिक धाडसी होत आहेत. यामुळे विकसित भारताबाबतचा माझा विश्वास अधिकाधिक दृढ होत चालला आहे,’ असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.