मनोज जरांगे यांना सलाइन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
manoj jarge patil on saline latest updates on hunger strike
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री अडीचनंतर सलाइन लावून घेतले. त्यांची मंगळवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या उपोषणाला ११ दिवस पूर्ण झाले असून त्यांचे वजन कमी झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचा जरांगे यांनी पुन्हा सांगितले.

जरांगे म्हणाले, की न्यायमूर्ती शिंदे समितीच्या दौऱ्यात काहीही होणार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ती एक चाल आहे. हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र पडताळणी न देता सरकारने वर्षभर फसविले आहे. सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत आले नाही तरी चालेल. त्यांच्यावाचून आमचे काही अडणार नाही. मुंबईला जाण्याचा मार्ग लोणीतून काढू. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंद असलेल्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
समितीची आज बैठक

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी व अडचणींचे निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा; तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.