Appa The Beacon Of Education And Incarnation Of Gandhian Ideals
आमचे दीपस्तंभ : आप्पा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
त्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि प्रांजळ व्यक्तिमत्त्व लाभलेले शिक्षक पुंडलिक वालजी कुमावत यांना आम्ही आदरानं ‘ आप्पा ’ म्हणत असू. पांढरा सदरा, शुभ्र पांढरं धोतर आणि पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख होता. सत्य, अहिंसा आणि सचोटी या गुणांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. गांधीवादावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. गांधीवादी विचार ते आचरणातही आणत असत.
त्यांची बुद्धिमत्ता विशाल होती. वैचारिक प्रगल्भता आणि दूरदृष्टी त्यांच्या ठायी होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आणि संघर्षातून शिक्षण घेऊन ते शिक्षक झाले. त्यांच्या जीवनप्रवासात विधवा आई आणि धर्मपत्नी कौसल्या यांचीच साथ होती. अविरत श्रम, शिस्त, संयम आणि प्रचंड अभ्यासू वृत्ती या गुणांच्या बळावर त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं. ‘विद्यार्थी हीच देशाची खरी संपत्ती आहे,’ असं ते मानत. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या आणि इच्छा असणाऱ्या सर्वांना ते मार्गदर्शन करीत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या घराचे दरवाजे शिक्षणासाठी खुले होते. स्वतःच्या मुलांबरोबरच त्यांनी इतर स्नेहीजनांची आणि आप्तेष्टांची मुलंही शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून घेतली. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नीचं मोठं योगदान होतं. ‘स्वतःची मुलं चांगली शिकली आणि घडली, तरच लोक विश्वासानं आपली मुलं आपल्याकडे पाठवतील,’ असा त्यांचा विश्वास होता. ही सहकार्याची भावना जपत त्यांनी सर्वांना सर्वतोपरी सहकार्य केलं. भाषा आणि गणित या विषयांवर त्यांचं प्रभुत्व होतं. व्याकरणाचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. आज त्यांची सर्व मुलं आणि मुली पुणे-मुंबईसारख्या शहरांत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मी सन १९७७-७८पासून या परिवाराशी जोडला गेलो. निमित्त होतं त्यांचा मोठा मुलगा प्रल्हाद. तो माझा वर्गमित्र होता. त्या काळात त्यानं बीई (सिव्हिल) आणि एमटेक केलं, तर मी एमएस्सी, बीएड करून वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झालो. फुलांच्या परागकोषात लपलेला कृमीही फुलांसोबत देवदर्शन घेतो; तसंच चांगल्या व्यक्तींच्या सहवासामुळे आपलंही आयुष्य उजळून निघतं. आप्पांनी दिलेली संस्कारांची शिदोरी आणि परिवारातील सर्वांचा प्रेमळ सहवास आनंददायी व प्रेरणादायी होता. आज मागं वळून पाहताना या आठवणी मनात सतत जाग्या होतात. आज आप्पा हयात नाहीत; पण त्यांचे स्मरण सतत होत राहतं. आमच्यासाठी ते खऱ्या अर्थानं दीपस्तंभ होते. अशा निर्व्यसनी, निष्कलंक, निःस्वार्थी, निरपेक्ष आणि निःस्पृह आदर्श शिक्षकाला विनम्र अभिवादन!