पाऊस गायब झाल्याने वाळत चाललेली पिके सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, खंडित वीजपुरवठ्यामुळे विहिरीत असूनही पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने पिके करपत चालली आहेत. पिकांचे होणारे नुकसान पाहावल्या जात नसल्याने चिखली तालुक्यातील पंधरा गावांमधील संतप्त शेतकऱ्यांनी मंगरूळ नवघरे येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढत ठिय्या मांडला.
महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृषी वाहिनीचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प होता. शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने सोयाबीन, कापूस, तुरीसह अन्य पिके करपू लागली आहेत. आधीच शेतकरी संकटात असताना निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा त्याच्यावर पाणी आणि विजेच्या समस्येचे आभाळ कोसळले आहे. या खंडित वीजपुरवठ्याचा फटका चिखली तालुक्यातील दहिगाव, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड मानमोड, करतवाडी, वरखेड, नायगाव खुर्द, नायगाव बुद्रुक, पेनसावंगी, सावरखेड, उत्रादा, दहिगाव शिवार आणि डोंगरगाव यासह परिसरातील पंधरा गावांमधील शेतकऱ्यांना बसला आहे.