शॉर्टसर्किट देखभालीअभावीच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
hospital shortcircuits and fire accidents need for caution
शॉर्टसर्किट अचानक होत असला तरी, प्रत्यक्ष विद्युत भारानुसार योग्य नियोजन व नियमितपणे काटेकोर देखभाल नसेल तर शॉर्टसर्किट कधीही आणि कुठेही होऊ शकतो. साहजिकच खूप जास्त प्रमाणात विद्युत उपकरणांचा वापर होत असलेल्या रुग्णालयांमध्ये अचूक काळजी नसेल तर कधीही जीवघेणा अपघात होऊ शकतो, याकडे विषय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

२४ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात शिशूंचा मृत्यू झाला. या स्फोटामागे शॉर्टसर्किट हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२१ मध्ये भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात दहा नवजात शिशूंचा, तर त्याच वर्षात अहिल्यानगर येथील अग्नितांडवात ११ करोनाबाधित रुग्णांचा जळून मृत्यू झाला होता. दोन्ही घटनांमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट व अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. रुग्णालयांमध्ये खूप जास्त उपकरणे वापरली जात आहेत आणि बहुतेक उपकरणे विजेवर चालणारी आहेत. विजेचा भार वाढत असतानाच, प्रत्यक्ष विद्युत भार व त्यानुसार नियोजन व काटेकोर देखभाल खूप आवश्यक आहे. याबाबत दुर्लक्ष व अनास्था हीच विविध अपघातांना आमंत्रण देणारी असल्याचे प्रा. नितीन भस्मे म्हणाले.
मुळात कॉम्प्रेसर असलेल्या सर्वच उपकरणांना पुरेसा आराम खूप गरजेचा आहे. अशी उपकरणे विनाखंड सुरू असल्यास उष्णता निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होऊन शॉर्टसर्किट होण्याची किंवा आग लागण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे कुठलाही एसी २४ तास सुरू असेल तर हा धोका वाढतो. त्यामुळे एनआयसीयू किंवा आयसीयूमध्ये दोन एसींचा टप्प्याटप्प्याने वापर होणे गरजेचे आहे; म्हणजेच एक एसी १२ तास वापरल्यानंतर दुसरा एसी पुढील १२ तास वापरणे गरजेचे आहे. तेव्हाच एसीमुळे अपेक्षित धोका टळू शकतो. पुन्हा अतिदक्षता विभागात ‘स्प्लिट एसी’ऐवजी ‘सेंट्रल एसी’च्या वापरामुळे अतिदक्षता विभागाच्या आतमध्ये धोका होण्याची शक्यता बरीच कमी होते. तसेच वीज गळतीतून संभाव्य शॉर्टसर्किट टाळण्यासाठी आरसीसीबी, आरसीबीओ या सुरक्षा साधनांचा प्रभावी वापर आवश्यक आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता (विद्युत) तौसिफ दारूवाला यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.