Indian Hockey Team Gets Blue Jersey Again Significant Change For Asian Championship
भारतीय हॉकी संघाला पुन्हा निळी जर्सी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘ हॉकी इंडिया ने भारतीय संघाच्या जर्सीसाठी पूर्वीचा निळा रंग निवडला असून, पर्यायी दुसरा रंग म्हणून केशरी रंगाची जर्सी असेल,’ असे ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी मंगळवारी सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (एशियाड) भारताचा महिला संघ मंगळवारी रवाना झाला, त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती देण्यात आली.
भारताचे पुरुष आणि महिला हॉकी संघ जपानच्या आयची-नागोया येथे होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत निळी जर्सी परिधान करणार आहेत, याची माहिती तिर्की यांनी दिली. ‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) संघांच्या किटच्या रंगांबाबत पर्याय दिले होते, त्यानंतर ‘हॉकी इंडिया’ने भारतीय संघाच्या जर्सीसाठी निळ्या रंगाला पहिली पसंती दिली,’ असे तिर्की यांनी नमूद केले. भारतीय महिलांची सलामीची लढत २० सप्टेंबरला उझबेकिस्तानविरुद्ध होणार आहे.गेल्या महिन्यात नेदरलँड्स-बेल्जियम येथे झालेल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय हॉकी संघांच्या जर्सीसाठी पारंपरिक निळ्या रंगाऐवजी केशरी रंगाची निवड करण्यात आली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्या वेळी तिर्की यांनी या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. आपल्या माहितीशिवाय जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरणही तिर्की यांनी दिले होते. ‘अॅस्ट्रोटर्फ’चा रंग निळा असल्यामुळे संघाच्या पोषाखाचा रंग बदलण्याचा निर्णय झाला असल्याचा दावा त्या वेळी ‘हॉकी इंडिया’ने केला होता.
मोकी (चीन) : भारताच्या ज्युनिअर संघांनी आशिया चषक हॉकी स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली आहे. भारतीय मुलींनी जपानचा ७-० असा पराभव केला. भारताने सलग तिसरा विजय नोंदवून बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. याआधी भारताने कोरियाचा ४-१ आणि मलेशियाचा ११-१ असा पराभव केला होता. आज, बुधवारी भारताची लढत चीनविरुद्ध होईल. कर्णधार अनमोल एक्का याच्या दोन गोलमुळे भारताने मुलांच्या गटात दक्षिण कोरियावर ७-३ असा खणखणीत विजय मिळवला. आता बुधवारी आपल्या अखेरच्या गट लढतीत भारताचा सामना तैवानशी होईल.