आता सत्तरीतही भूषवा ‘आयओए’मध्ये पद!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indian olympic association gains extended tenure
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या ( आयओए ) पदाधिकाऱ्यांचा दीर्घ कार्यकाळ भूषविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी ‘आयओए’ने आपल्या विशेष सर्वसाधारण सभेत घटनेतील काही बदल मंजूर केले आहेत. जे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याच्या (एनएसजीए) अनुरूप असतील. अन् या दुरुस्तीमुळे ‘आयओए’च्या पदाधिकाऱ्यांना दीर्घकाळ पद भूषविता येईल.

‘आयओए’च्या कार्यकारी समितीने १९ ऑगस्ट रोजी झालेल्या आपल्या बैठकीत आधीपासून लागू असलेल्या घटनेत केलेल्या दुरुस्त्या मंजूर केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी सर्वसाधारण सभेच्या विशेष बैठकीत या बदलांना अंतिम मान्यता देण्यात आली. ‘ही केवळ एक औपचारिकता होती. सर्वसाधारण सभेत कार्यकारी परिषदेच्या संख्येशी संबंधित तरतूद वगळता ‘एनएसजीए’च्या अनुरूप सर्व बदल मंजूर झाले,’ असे ‘आयओए’च्या कार्यकारी समितीच्या एका सदस्याने सांगितले. अर्थात, हा घटनाबदल अनेकांना पटलेला नाही.