भारताची पाचपदकांची कमाई

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indias medal haul of five in para archery stage three
अहमदाबाद : भारताने जागतिक पॅरा-तिरंदाजी मालिकेच्या तिसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्राँझ अशी एकूण पाच पदके जिंकली. पुरुषांच्या कंपाउंड आणि रिकर्व्ह संघांनी सुवर्णपदके पटकावली, तर स्वाती चौधरीने दोन पदकांची कमाई केली.

जगज्जेता तोमनकुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी पुरुष कंपाउंड सांघिक स्पर्धेत इराकवर १५२-१३९ असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले, तर हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांनी पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करून स्लोव्हाकियाच्या संघाचा ६-२ असा पराभव करून पुरुष रिकर्व्ह सांघिक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. महिला रिकर्व्ह संघातील भावना आणि पूजा यांना चीनकडून ०-६ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर स्वाती आणि आदिल महंमद नझीर अन्सारी यांनाही मिश्र सांघिकमध्ये (डब्ल्यू-१, रिकर्व्ह/कंपाउंड) रौप्यपदकच मिळाले. त्यांना चेक प्रजासत्ताकच्या सार्का पुल्तार मुसिलोव्हा आणि डेविड द्राहोनिन्स्की यांच्याकडून १-५ (३१-३८, ३३-३७, ३३-३३) असा पराभव पत्करावा लागला.
स्वातीने वैयक्तिक (डब्ल्यू-१) गटात ब्राँझपदक मिळवले. तिने रशियाच्या एलेना क्रुतोव्हा हिला ६-२ असे हरवले. महिला कंपाउंड सांघिक स्पर्धेत भारताचे ब्राँझपदक थोडक्यात हुकले.