मनोज जरांगे यांना सलाइन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मनोज जरांगे यांना सलाइन
मराठा समाजाला न्याय

आम्हीच देणार : मुख्यमंत्री
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री अडीचनंतर सलाइन लावून घेतले. त्यांची मंगळवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या उपोषणाला ११ दिवस पूर्ण झाले असून त्यांचे वजन कमी झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचा जरांगे यांनी पुन्हा सांगितले.

जरांगे म्हणाले, की न्यायमूर्ती शिंदे समितीच्या दौऱ्यात काहीही होणार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ती एक चाल आहे. हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र पडताळणी न देता सरकारने वर्षभर फसविले आहे. सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत आले नाही तरी चालेल. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंद असलेल्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.

मराठा समाजाला न्याय

आम्हीच देणार : मुख्यमंत्री

मुंबई : मराठा समाजाला आतापर्यंत जे दिले, ते आमच्या सरकारनेच दिले आहे. यापुढेही समाजाच्या प्रश्नांवर निर्णय घ्यायचे असतील तर ते आम्हीच घेणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.