‘मराठा समाजाला आजवर जे काही मिळाले, ते आमच्या सरकारनेच दिले आहे. यापुढेही समाजाच्या प्रश्नांवर निर्णय घ्यायचे असतील, तर ते आम्हीच घेणार आहोत,’ अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मांडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. उरण येथील पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ‘मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील सर्वांची भूमिका स्पष्ट आहे. आजपर्यंत मराठा समाजाला जे दिले, ते आम्हीच दिले. जे निर्णय घेतले, तेही आम्हीच घेतले. यापुढे काही निर्णय घ्यायचे असतील, तर तेही आम्हीच घेणार,’ असे फडणवीस म्हणाले. ‘केवळ कागदोपत्री निर्णय घेण्यापेक्षा त्या निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ समाजाला मिळणे महत्त्वाचे आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा मराठा समाजाला प्रत्यक्ष फायदा झाला आहे,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.