पुण्याच्या नीरज नांदेडे याने अखेर मोसमातील चौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील तेरा वर्षांखालील मुलांत जेतेपद पटकावले.
वर्ध्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. मोसमातील दुसऱ्या राज्य मानांकन स्पर्धेतील अंतिम लढतीत वरदान कोलतेने नीरजवर सरळ गेममध्ये, तर तिसऱ्या राज्य मानांकन स्पर्धेत युवान वालियाने नीरजवर मात करून जेतेपद मिळवले होते. या वेळी पुन्हा एकदा जेतेपदापदासाठी वरदान कोलते आणि नीरज नांदेडे आमनेसामने होते. साहजिकच या वेळी तरी नीरज बाजी मारणार, की वरदान जेतेपद पटकावणार याबाबत उत्सुकता होती. ही लढत काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. पाच गेमपर्यंत रंगलेल्या या अंतिम लढतीत अखेरीस नीरजने १२-१०, १०-१२, १२-१०, ७-११, ११-८ अशी मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत वरदानने मुंबई शहरच्या युवान वालियावर ११-३, ६-११, ११-९, ११-६ अशी, तर नीरजने सोलापूरच्या राजवर्धन तिवारीवर ११-५, १३-११, ३-११, ११-६ अशी मात केली होती.ठाण्याच्या प्रतीक तुलसानीने १५ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत प्रतीकने मुंबई उपनगरच्या राघव महाजनवर ११-२, ११-६, ११-३ अशी मात केली.