‘ पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम ’चा ( पीसीओएस ) विळखा दिवसेंदिवस वाढत असून, तरुण महिलांमध्ये ‘पीसीओएस’चे प्रमाण २२ टक्क्यांवर गेल्याचे विविध शास्त्रीय अभ्यासांमधून पुरेसे स्पष्ट झाले आहे. दुर्दैवाने, याची जाणीव समाजामध्ये अत्यल्प आहे, याकडे ‘पीसीओएस’ जागृतता महिन्यानिमित्त तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
‘पीसीओएस’चे झपाट्याने वाढलेले प्रमाण आणि त्यातून उद्भवणारी दुष्परिणामांची मालिका, याचा सर्वाधिक वाईट परिणाम तरुण महिलांच्या जीवनावर कितीतरी जास्त होत आहे. या विषयी जागृतता निर्माण होण्याच्या दृष्टीने दरवर्षी सप्टेंबर महिना हा ‘पीसीओएस’ जागृतता महिना म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे ‘पीसीओएस’विषयी विविधस्तरीय अभ्यास होत असून, पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या अभ्यासात महाराष्ट्राचे प्रातिनिधिक चित्र स्पष्ट झाले आहे. या संबंधीचा अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिप्रोडक्शन, कॉन्ट्रासेप्शन, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉकॉलॉजी’मध्ये मागेच प्रसिद्ध झाला आहे. या अंतर्गत बीजे मेडिकल कॉलेजच्या स्त्रीरोग विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) वर्षभरात आलेल्या सुमारे १०० महिलांचा अभ्यास करण्यात आला. यात २१ टक्के महिलांमध्ये ‘पीसीओएस’चे प्रमाण आढळून आले; तसेच शारीरिक हालचाली-व्यायाम नसणे, अनियमित पाळी, २५ पेक्षा जास्त बीएमआय, कंबर-नितंब घेराचे गुणोत्तर ०.८६ पेक्षा जास्त असणे ही धोक्याची घंटा असल्याचे या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. मुळात ‘पीसीओएस’विषयी फार कमी जनजागृतता असून, या आजारावर वेळी मात करण्यासाठी कमी वयात व आजाराची पायरी कमी असतानाच निदान-उपचार व समाज शिक्षण होणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढील गुंतागुंत टळू शकेल, याकडे अभ्यासात लक्ष वेधण्यात आले आहे.‘इंडियन जर्नल ऑफ एन्डोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम’मध्येही ‘पीसीओएस’चे प्रमाण २२ टक्क्यांवर गेल्याचे नोंदवत, किशोरवयीन वयापासूनच उद्भवणाऱ्या या आजाराच्या लवकर तपासणीसह आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा जागर व भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी लवकर वैद्यकीय हस्तक्षेप गरजेचा असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे.
जीवनशैलीशी निगडित आजार
‘पीसीओएस’मागे काहीअंशी जनुकीय कारणे असली तरी, हा आजार अधिकांशरित्या जीवनशैलीशी निगडित आहे. अगदी बालवयापासूनच चिप्स, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, बिस्किट, मैद्याचे पदार्थ असे कितीतरी अतिप्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचे सेवन अतिप्रमाणात होत आहे. पुन्हा सरसकट तेलकट-तुपकट खाण्याचे आणि वेळी-अवेळी खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, मैदानी खेळ, शारीरिक हालचाल-व्यायाम, शारीरिक कष्ट कमी झाले आहेत व बालवयापासूनच मुले-मुली स्क्रीवर जास्त प्रमाणात राहात आहेत. पुन्हा आहारात आवश्यक प्रथिने, तंतुमय पदार्थ, फळे-भाज्यांचा समावेश कमी आहे व पालकांमध्येही याची जाणीव कमी आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून ‘पीसीओएस’चे प्रमाण खूप जास्त वाढत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रा. डॉ. सोनाली देशपांडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
१८ व्या वर्षी ७५ किलोंचे वजन
दिवसेंदिवस पीसीओएसचे रुग्ण वाढत असल्याचे अतिशय स्पष्टपणे जाणवत आहे. अशाच एका १८ वर्षांच्या युवतीचे वजन चक्क ७५ किलो इतके होते. ‘पीसीओएस’कडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही, याकडे महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांनी लक्ष वेधले.