वटवृक्षांची कत्तल; निसर्गप्रेमींकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
वटवृक्षांची कत्तल; निसर्गप्रेमींकडून श्रद्धांजली
पडेगाव रस्त्यावर अमानुषपणे कत्तल केलेल्या वटवृक्षांना शहरातील निसर्गप्रेमींकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. या संबंधीची याचिका पुणे एनजीटी येथे सुरू आहे; तसेच न्यायालयाने प्रशासनाला फटकारले असताना, न्यायालयाचा आदेश न जुमानता ही कत्तल बांधकाम विभागाने सुरू केल्याचा आरोप करीत, निसर्गप्रेमींनी निषेध आंदोलन केले.

काही ठराविक वटवृक्षांचे पुनर्रोपण करणार, असे प्रशासनाने म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र पुनर्रोपण करण्यात येणारी झाडेही तोडण्यात आली आहेत. पंधरा ते वीस फूट खोड ठेवून प्रशासन देखाव्यासाठी अशास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करणार आहे. सुमारे एक किलोमीटर रस्त्याच्या लांबीमध्ये वटवृक्ष सोडून बाकीच्या वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली आहे. लिंब, चिंच, महारुख प्रजातींच्या ४० ते ५० वर्षे वयाच्या झाडांची जमिनीलगत कत्तल करण्यात आली आहे. झाडांची मोठमोठी खोडे अस्ताव्यस्त पसरली आहेत. असे एकीकडे विदारक दृश्य असताना, दुसरीकडे अनेक पक्षी, कीटक, सरिसृप यांचे आश्रयस्थान हिरावून घेण्यात आले आहे. झाडांची लागवड कुठे केली जाणार आहे, हेसुद्धा प्रशासनाने निश्चित केलेले नाही. पुन्हा लागवड केली जाणार आहे की ही झाडेसुद्धा इतर झाडांप्रमाणे सॉ मिलला विकली जाणार आहेत, असा प्रश्न निसर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे. दरम्यान, तोडलेल्या झाडांना फुले व पुष्पहार वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी याचिकाकर्ते रुपेश कलंत्री, मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक, प्रयास संस्थेचे रवी चौधरी, उल्लू संस्थेचे मनोज शहा, महादेव कल्याणी, शिरीष कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.